RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

प्रशांत यादव यांच्या प्रचारार्थ खासदार अमोल कोल्हेंनी चिपळूणातील सभा अक्षरशः गाजवली; म्हणाले, प्रशांत यादव यांना विजयी करा, विजयी मिरवणुकीला मी स्वतः येतो

गद्दारीची जखम अजून भळभळतेय, गद्दारांच्या छाताडावर भगवा फडकवा- खासदार अमोल कोल्हे

आमच्या अंगावर येणे तुम्हाला पडवणारे नाही, आमच्या संयमाचा अंत पाहू नका- प्रशांत यादव कडाडले

चिपळूण- साडेतीनशे वर्षांपूर्वी याच मतदारसंघात संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी राजे यांच्याबरोबर गद्दारी झाली, ती जखम अजून भळभळतेय. त्या वेदना अजून होत आहेत पण शेवटच्या श्वासापर्यंत लढायचे कसे हे शंभूराजे शिकवून गेलेत आता पुन्हा येथे गद्दारी झाली आहे. हा कडक पाषाणाचा सह्याद्री आहे. येथे गद्दारी खपवून घेतली जाणार नाही. गेल्यावेळी आलो आणि चिपळूणच्या चौकात भगवा नाचवला, त्यामुळे काही लोकांना बळ मिळाले होते, पण यावेळी गद्दारांच्या छाताडावर भगवा फडकवण्यासाठी आलोय, अशा आक्रमक शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी तुफान संवादकेक आणि डायलॉगबाजी करत चिपळूण येथील सभा अक्षरशः गाजवून सोडली. ही महाराष्ट्र धर्माची निवडणूक आहे हे लक्षात ठेवून मतदान करा, आणि प्रशांत यादव यांना प्रचंड मतांनी विजयी करा, विजयी मिरवणुकीला मी स्वतः येतो असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक तथा अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारासाठी आज शनिवारी चिपळूणमध्ये आले होते. त्यांच्या उपस्थितीत चिपळूण बहादूरशेख येथील वि. दा. सावरकर मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार रमेशभाई कदम, राष्ट्रवादीचे निरीक्षक बबन कनावजे, रहिमान शेख, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तसेच रिपब्लिकन पक्षाचे सर्वच महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेसाठी मैदान जणू कमी पडले इतकी तुफान गर्दी उसळली होती. पुन्हा एकदा गर्दीचा उच्चांक या मैदानात पाहण्यास मिळाला. खासदार अमोल कोल्हे यांनी सुरुवाती पासूनच आक्रमक पवित्रा घेत भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार साहेबांचे वादळ आले असे सांगितले जात होते. परंतु यावेळी वादळ नव्हे तर चक्क सुनामी आलेली आहे. या सुनामीत गद्दारांचा पाळापाचोळा झाल्याशिवाय राहणार नाही. येथून जरा गुहागरला जाण्याची इच्छा होती. पण पुढे आणखी चार सभा आहेत. त्यामुळे वेळ मिळत नाहीये, अन्यथा तिथे देखील जरा खळबळ उडवून आलो असतो. असेही ते म्हणाले.

मी शिवसेनेत काम केलंय, त्यामुळे मला चांगले माहीत आहे. शिवसैनिक सहजासहजी पेटत नाही. पण एकदा का पेटला की मग त्याला शांत करणे कोणालाही श्यक्य नाही. तो अंगार आहे आणि आता मी पूर्ण महाराष्ट्रात बघतोय तेच चित्र चिपळूणमध्ये ही बघतोय, शिवसैनिक पेटलाय, आता त्याला थांबवणे कोणाच्या बापालाही शक्य नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राला जी वागणूक दिली गेली ती शिवसैनिकांना पेटवणारी ठरली आहे. शिवसैनिक संतापला आहे. पक्षप्रमुखांच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी तो तडफडतो आहे. त्यामुळे समोरच्यांनी आता सावध रहावे, असे अमोल कोल्हे यांनी म्हणताच गर्दीतून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आणि संपूर्ण परिसर दणाणून गेला. अमोल कोल्हे आज चांगलेच आक्रमक दिसत होते. ते म्हणाले उद्धव ठाकरे गंभीर आजारात पडलेले असताना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याऐवजी रातोरात पळून गेले. पुढे त्यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचले, पक्ष आणि चिन्हे चोरले. अरे पाठीमागून कसले वार करता,.? अरे समोरासमोर मैदानात लढायचे होते ना…! रक्त आठवून घाम गाळून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला पक्ष एका रात्रीत पळवता.? शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. असेही ते म्हणाले.

चिपळूणमध्ये गुलाबी रंगांची यात्रा आली होती म्हणे, तुम्ही बघितला का गुलाबी रंग? निरखून बघीतलं का.?काय, काय दिसलं? अशी जोरदार टोलेबाजी करत खासदार अमोल कोल्हे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. अहो त्या गुलाबी रंगामागे गद्दारीचा डाग आहे. तो कदापी पुसला जाणार नाही. पितृतुल्य पवार साहेबांना या वयात तुम्ही दगा दिला..! एका रात्रीत पळून गेले. आणि म्हणाले आम्ही विकासासाठी गेलो, अरे कसला विकास केलात.?अडीच वर्षे खा-खा खाऊन निवडणुकीच्या तोंडावर दोन दिवसात तब्बल अडीचशे जीआर काढले. हा विकास का? असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक असलेले प्रकल्प थेट गुजरातला देऊन टाकले. मोदींच्या समोर फक्त माना हलवत राहिले, वेदांत फॉस्कॉन, ब्लड्रगपार्क, टाटा एअरबस असे मोठे प्रकल्प थेट गुजरातला घेऊन गेले आणि येथील लाखो तरुणांचे रोजगार पळवले, आमच्या हक्काचा, आमच्या मराठी तरुणांचा रोजगार तुम्ही पळवता? महाराष्ट्रात मराठी माणसाकडे मत मागायचा अधिकार महायुतीला नाही. आणि येथील मराठी माणूस महायुतीला मतदान करणार देखील नाही. असेही अमोल कोल्हे म्हणाले. तर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांनी आज थेट आक्रमक भूमिका घेत विरोधकांना रोखठोक सुनावले, पराभव समोर दिसल्यामुळे आता मानसिक संतुलन ढासळलय, आता आमच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर जाऊन मारहाण करण्यापर्यंत मजल गेली आहे. पण आज पुन्हा एकदा सांगतो. आमच्या अंगावर येणे तुम्हाला पडवणारे नाही. आमच्या संयमाचा अंत पाहू नका, जर का आमचा संयम सुटला आणि आमचे रथीमहारथी पिसाळले तर मात्र थांबवणे कठीण होईल, असा थेट इशाराच त्यांनी दिला.

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

Must Read

©2024 Live Kokan Express All Right Reserved.