चिपळूण (प्रतिनिधी):– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी प्रदेश सरचिटणीस तथा वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी जाहीर झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे ‘एबी’ फॉर्म दिला असल्याचे समोर आले आहे. ते गुरुवार दिनांक २४ रोजी सकाळी १०.३० वाजता महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावरून चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी काँग्रेस मधून प्रशांत यादव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उमेदवारीचे संकेत देण्यात आले. यानुसार यादव यांनी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष वाढीसाठी मेहनत घेतली. दरम्यान, गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची जंगी सभा झाली. या सभेनंतर महाविकास आघाडी तर्फे प्रशांत यादव यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळाले.
यानुसार यादव यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार मोर्चे बांधणी केली याचेच फलित म्हणून महाविकास आघाडीच्या जागा वाटपात चिपळूण – संगमेश्वरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आली असून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे प्रशांत यादव यांना ‘एबी’ फॉर्म देण्यात आले असल्याची माहिती उपलब्ध झाली असून ते गुरुवार दिनांक २४ रोजी सकाळी १०.३० वाजता महाविकास आघाडीचे नेते तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत शक्तीप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
यावेळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला जाईल. यानंतर रॅली चिंचनाकामार्गे चिपळूण नगर परिषद पर्यंत जाईल. नगर परिषदेसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाणार आहे. ही रॅली पॉवर हाऊस मार्गे प्रांत कार्यालयापर्यंत काढली जाणार आहे. नंतर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळासमवेत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करणार आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे यादव यांना उमेदवारी मिळाल्याचे समोर आल्याने महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून यादव यांना विजयी करण्याचा निर्धार या सर्वांनी व्यक्त केला आहे. यावेळी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.