रत्नागिरी शहरातील बालनिरीक्षणगृहातून दोन मुलं बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १५ व १८ ऑक्टोबर रोजी घडली. अचानक मुले बेपत्ता झाल्याने निरीक्षणगृह येथे एकच खळबळ उडाली. याप्रकरणी कर्मचार्यांकडून शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार शहर पोलिसांकडून या मुलांचा शोध घेण्यात येत आहे.बेपत्ता झालेल्या मुलांमध्ये एकाचे वय १४ वर्षे असून दुसर्याचे १७ वर्षे आहे. १४ वर्षीय मुलगा हा १७ फेब्रुवारी २०२१ रोजी केरळ पालीस व जिल्हा बाल संरक्षण कक्ष कन्नुर यांच्याकडून बाल निरीक्षण गृह रत्नागिरी येथे दाखल करण्यात आला होता. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास हा मुलगा निरीक्षण गृह येथील शयनकक्षात झोपलेला दिसून आला. यानंतर तेथील कर्मचारी लाईट बंद करण्यासाठी गेले असता हा मुलगा आपल्या बेडवर दिसून आला नाही. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.