धन्वंतरी धर्मादाय संस्थेतर्फे परकार हॉस्पिटल येथे रत्नागिरी रक्त साठवणूक केंद्र (रत्नागिरी ब्लड स्टोअरेज सेंटर) चालविण्यात येते. या केंद्राचा दुसरा वर्धापन दिन काल झाला. दोन वर्षामध्ये रत्नागिरीकरांसाठी २ हजार एवढ्या रक्तपिशव्या व आवश्यकतेप्रमाणे इतर रक्तघटक उपलब्ध करून दिले आहेत, अशी माहिती केंद्रातून देण्यात आली.जुलै २०२२ मध्ये परकार हॉस्पिटल येथे रत्नागिरी रक्त साठवणूक केंद्र सुरू करण्यात आले. हे केंद्र चालू करण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे रत्नागिरीतीलच नागरिकांनी रत्नागिरीकरांच्या सेवेसाठीच उभा केलेला रक्तासाठीचा एक तिसरा पर्याय. हा पर्याय उभा करताना रत्नागिरीमधील अन्य प्रस्थापित रक्तपेढींशी कुठल्याही प्रकारची व्यावसायिक स्पर्धा केलेली नाही. गरजू रूग्णांना सेवा देण्यासाठीच काम केले जाते. हे केंद्र शासनमान्य अधिकृत आहे. शासकीय अन्न आणि औषधे खात्याच्या सूचना तसेच मार्गदर्शक तत्वानुसारच केंद्र चालवले जाते. त्यामुळे या केंद्रामार्फत पुरवण्यात येणार्या रक्तपिशव्या या महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या नियमावलीप्रमाणेच सेवाशुल्क विक्री केली जाते.