पुणे भारत गायन समाज संस्थेतर्फे दिला जाणारा कै. नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार यावर्षी रत्नागिरीतील गायिका सौ. श्वेता जोगळेकर यांना नुकताच प्रदान करण्यात आला. गेली १२ वर्षांतील संगीत रंगभूमीवरील वाटचालीची दाखल घेऊन सौ. जोगळेकर यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ज्येष्ठ गायिका मधुवंती दांडेकर यांच्या हस्ते पुणे येथील कार्यक्रमादरम्यान पुरस्कार देण्यात आला. रोख रक्कम आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.सौ. श्वेता जोगळेकर यांनी एस.एन.डी.टी. पुणे विद्यापीठातून संगीत विषयात एम.ए. पदवी संपादन केली आहे. आई सौ. शिल्पा तांबे तसेच कविता गाडगीळ यांच्याकडे गायनाच्या प्राथमिक शिक्षणानंतर पुणे येथील डॉ. सौ. शोभाताई अभ्यंकर यांच्याकडे शास्त्रीय आणि डॉ. संजीव शेंड्ये यांच्याकडे उपशास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. २०१३ मध्ये संगीत रंगभूमीवर पदार्पण केले. संगीत कट्यार काळजात घुसली नाटकात झरिना, संगीत संशयकल्लोळ (रेवती), संगीत प्रीतीसंगम (सखू), संगीत सौभद्र (सुभद्रा), संगीत ययाती देवयानी (शर्मिष्ठा), संगीत मानापमान (भामिनी), डॉ. विद्याधर ओक लिखित संगीत ताजमहालमधील गौहर अशा विविधांगी भूमिका त्यांनी यशस्वीपणे साकारल्या आहेत. रत्नागिरीसह, पुणे आणि गोवा येथील विविध संस्थांच्या नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या मराठी संगीत हौशी नाट्य स्पर्धेत दोनवेळा रौप्यपदक पटकावले आहे. तसेच मुंबई नाट्य परिषदेमार्फत २०१३-१४ चा पं. गजानन खाडिलकर पुरस्कार, २०१९ मध्ये बालगंधर्व रसिक मंडळी पुणे यांचा रंगभूमी वरील उत्कृष्ट गायिका अभिनेत्रीला दिला जाणारा काकासाहेब खाडिलकर पुरस्कार अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.या पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान त्यांच्या गायनाचा कार्यक्रमही पार पडला. त्याला हेरंब जोगळेकर (तबला) आणि श्रीरंग जोगळेकर (संवादिनी) यांनी साथसंगत केली. या कार्यक्रमाला प्रख्यात गायिका मालती पांडे-बर्वे यांचे पुत्र राजीव बर्वे, भारत गायन समाज संस्थेच्या अध्यक्ष शैला दातार, शिल्पा पुणतांबेकर, सावनी कुलकर्णी आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.