रत्नागिरी : जिल्हयात सर्वत्र परतीच्या पावसाने आणि त्यानंतर आलेल्या अवकाळी पावसाने भात शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण, रत्नागिरी आदी भागात भात शेती कापणीला आली असताना मोठया प्रमाणात पाऊस झाल्याने नुकसान झाले आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तरी जिल्हयातील शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी जिल्हा कृषी अधिकारी श्री शिवकुमार सदाफुले यांच्या कार्यालयाला भेट देऊन केली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुका सरचिटणीस सुशांत पाटकर, शहर सरचिटणीस मंदार खंडकर, आयटी जिल्हा संयोजक निलेश आखाडे आदी उपस्थित होते.