रत्नागिरी, दि.०९. प्रतिनिधी : कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी युवा शाखेच्या वतीने सोमवार दि.११ मार्च रोजी रा.भा.शिर्के प्रशालेच्या रंजनमंदिर सभागृहात कथाकथन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात कथालेखक ज्ञानेश्वर पाटील पाऊल तिचं आणि दुर्गेश आखाडे अपहरण ही कथा सादर करणार आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी युवा शाखेच्या वतीने कथाकथनाचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्याचे दुसरे पुष्प रा.भा. शिर्के प्रशालेत गुंफले जाणार आहे. मोबाईलच्या काळात विद्यार्थ्यांना कथा ऐकण्याची सवय व्हावी. विद्यार्थ्यांनीही कथा लिहिण्याकडे आणि कथाकथनाकडे वळावे याकरीता हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कथाकथन उपक्रमाच्यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.दिलीप पाखरे, रा.भा. शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश चव्हाण, कोमसापचे जिल्हाध्यक्ष आनंद शेलार आणि सचिव राजेश गोसावी उपस्थित राहणार आहेत.