RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

लाडक्या भावांमध्ये कंदाल

अखेर महायुतीचे सरकार स्थापन झाले.निकालाच्या तब्बल १२ दिवसानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. मात्र युतीत नाराजी आहे हे लपून राहिलेले नाही.देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत . त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.एकनाथ शिंदे यांनी स्वतःशी
तडजोड करून शपथ ग्रहण कार्यक्रमात नाराजी आणि त्या अगोदर रुसणे त्याच्यानंतर त्यांच्याच सहकाऱ्यांकडून त्यांची समजूत काढणे आणि शपथविधी कार्यक्रमास उपस्थित राहून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी गळ घालणे अशा प्रकारच्या साऱ्या गोष्टी घडल्या.

आपल्याला किमान सहा महिने तरी मुख्यमंत्री राहू द्या अशी विनंती वजा मागणी एकनाथ शिंदे सातत्याने करत होते, त्यासाठी त्यांनी दिल्लीला ठाण मांडले होते. परंतु भाजपने यास ठाम नकार दिल्याने ते दिल्लीवरून महाराष्ट्रात आल्यानंतर ‘आजारी’ पडले. तब्येत ठीक नसल्याने ते आपल्या साताऱ्यातील गावी गेले व पुन्हा ठणठणीत होवून ठाण्यात आले पत्रकार परिषद घेऊन आपला सरकार स्थापनेस कोणताच अडथळा नसेल असे स्पष्टीकरण दिले. परंतु तरीही शिंदे यांची मागणी कायमच राहिली होती. त्यामुळे त्यांना पुन्हा ‘आजारी’ पडावे लागले. या दरम्यानच्या काळात किमान तीन वेळा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली व त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला कदाचित ती समजूत आणि शिष्टाई करण्यात त्यांना यश आले असल्याने त्यांनीही शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारले नाही तर आम्हीही कोणतेही मंत्री पद स्वीकारणार नाही अशी भूमिका उदय सामंत यांनी काल पत्रकार परिषद जाहीर केली होती परंतु एकूणच देहबोली पाहता सामंत यांच्यासह सर्वांनाच मंत्रिपदाची शपथ केव्हा घेतो आणि सरकारमध्ये केव्हा जातो अशीच घाई होती. त्यामुळे अशा प्रकारची भूमिका घेताना फार ‘जड’ जात होते. अर्थात तशी वेळ आली नाही. या शपथविधी कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते परंतु त्यांची देहबोली पाहता ते शिंदे यांच्या एकूण वर्तनावरच प्रचंड नाराज असल्याचे दिसून येत होते एकूणच महायुतीचा हा सारा कार्यक्रम नाराजी नाट्याचा मुख्य भाग होता की काय असे दिसून येत होते.एकनाथ शिंदे यांना सहा महिन्यासाठी मुख्यमंत्री बनायचे होते त्याचे मागचे मुख्य कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. शिंदे यांच्या शिवसेनेला ग्राउंड बेसला आणखी आपली पकड घट्ट करायची आहे व त्याचा मुख्य पाया हे स्थानिक स्वराज्य संस्था स्वतःच्या पक्षाच्या ताब्यात असणे महत्त्वाचे ठरते व त्या दृष्टीने शिंदे यांनी तयारी केली होती परंतु भाजपने त्यांच्या या नियोजनाला सुरुंग लावला असे म्हणावे लागेल.अर्थात भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाची यामध्ये काही चूक आहे किंवा राजकीयदृष्ट्या अयोग्य असे नाही. कारण जर ही जर ऐतिहासिक विजयाची नोंद झाली असेल आणि भाजप हा १३२ जागा जिंकून महाराष्ट्रात एक अत्यंत प्रभावी दावेदार व सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असेल तर नैसर्गिक न्याय तत्त्वाच्या आधारावर भाजपचाच मुख्यमंत्री होणं न्याय्य आहे.त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी अट्टाहास धरणे योग्य नव्हते. एरवी सर्वत्र बोलताना समंजसपणा आणि प्रगल्भता दाखवणारे शिंदे यांनी यावेळी मात्र आपली राजकीय परिपक्वता दाखवली नाही. खरंतर त्यांनी स्वतःहूनच उदारपणे आणि समंजसपणा दाखवून देवेंद्र फडणवीस अथवा कोणीही भाजपचा मुख्यमंत्री होवो हे अगोदरच घोषित करणे अपेक्षित होतं आणि योग्य होतं पण तसे झाले नाही.त्यामुळे तब्बल बारा दिवस हा खेळ चालू राहिला. या सर्वात अजित पवार यांची मॅच्युरिटी दखल घेण्यासारखी आहे.त्यांनी आपल्या पक्षाच्या एकंदरीत आवाका आणि आता मिळालेल्या जागा यानुसार आहे ती तडजोड पुढे सुरू ठेवली आहे. मुख्यमंत्रीपदाचा दावा सुटल्यानंतर किमान आपल्याला गृहमंत्रीखाते किंवा अन्य महत्वाची खाती ज्यामध्ये बांधकाम खाते मिळावं असा आग्रह एकनाथ शिंदे यांनी धरला आहे. मात्र गृहमंत्री खाते फडणवीस देतील अशी शक्यता नाही. परंतु तेवढेच महत्त्वाचे असलेले महसूलमंत्री खाते हे नगर विकास खात्याबरोबर शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आणि हीच तडजोड झाली असावी.राष्ट्रवादीकडे अर्थात अर्थ खाते जाणार हे जवळजवळ स्पष्ट आहे.ही बाब सुद्धा शिवसेनेला मान्य नाही कारण जर अर्थखाते अजित पवार यांच्याकडे गेले तर निधी त्यांच्या हातून सुटताना खूप कठीण आहे अशी त्यांची समजूत आहे त्यामुळे त्या गोष्टीला आहे त्यांचा विरोध आहेच . हा झाला सरळ साधा सांख्यिकी हिशोब. पण त्याच्या पाठीमागे भाजपची एक राजकीय सोच आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडल्यानंतर आमदार आणि नेते भाजपकडे आले त्यातून मागच्या अडीच वर्षातले सरकार स्थापन झाले. त्यावेळी भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने मोठे मन दाखवून आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकीय धाडसाचे कौतुक करून त्यांना त्वरित मुख्यमंत्रीपद बहाल केले व फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर राहण्याचे आदेश दिले.शिस्त आणि संघटनचे नियम प्रमाण मानून फडणवीस यांनी शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व नंतर उपमुख्यमंत्री झाल्यानंतर विरोधी पक्षाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली परंतु ती त्यांनी शांतपणे सहनही केली या काळामध्ये त्यांनी शिंदे यांना सहकार्य केले व तेवढाच सन्मानही दिला त्यांचा राजकीय संयम हा नोंद करण्यासारखाच होता. युतीने उर्वरित कालावधीत महाराष्ट्रात चांगली कामगिरीकरून दाखवली. या काळामध्ये शेवटच्या टप्प्यात म्हणजेच निवडणुकीच्या काही दिवस अगोदर लाडकी बहीण योजना जाहीर करून एकनाथ शिंदे यांनी क्रिकेटच्या भाषेत बोलायचे झाले तर, सरासरी पेक्षाही जास्त स्ट्रायकिंग रेट मिळवला आणि विरोधकांना धोबीपछाड दिला. अडीच वर्षाच्या काळामध्ये एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने वावरले त्यांनी काम केले आणि सर्वसामान्य लोकांमध्ये आपली प्रतिमा उमटवली आणि लोकांचा मुख्यमंत्री म्हणून जे चित्र तयार केले ते पाहून भाजपच्या मनात धास्ती निर्माण झाली असावी.एकनाथ शिंदे यांचा कामाचा धडाका आणि पद्धत पाहून ते आपल्याला भविष्यात डोईजड होतील का अशी शंका कदाचित भाजपच्या नेतृत्वामध्ये असावी. त्यामुळे परत एकदा मुख्यमंत्रीपद देण्याबाबत भाजप अंतर्गत जरूर तपासणी केलेली आहे. राज्यातील पक्ष आपल्याबरोबर किंबहुना आपल्या हाताखाली असावे ही भाजपची रणनीती महाराष्ट्रातही तशीच आहे त्यानुसार आत्ता जर एकनाथ शिंदे यांना परत मुख्यमंत्री केले गेले असते तर ते भाजपच्या कंट्रोलमध्ये राहिले असते का हा एक मोठा विषय आहे. या सर्व घडामोडीमुळे युतीमध्ये तेवढे काही बरे आहे हे खरे नाही.मात्र भाजपला प्रचंड बहुमत मिळाले याचा अर्थ त्यांना आपल्या मित्र पक्षांची गरजच नाही असाही नाही. पुढे जाऊन मराठा आरक्षणासारखा मुद्दा आहे पेटणार आहे.यावेळी मराठा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे यांना पुढे करावेच लागणार आहे. अजित पवार हे काहीसे आक्रमक आणि रोखठोक बोलणारे नेतृत्व आहे.त्या तुलनेने एकनाथ शिंदे हे मृदू आणि तोलामोलाचे संभाषण करणारे नेतृत्व आहे. एकनाथ शिंदे हे अशावेळी मदत करू शकतात याची कल्पना भाजपच्या नेत्यांना आहे.तरीही भाजप या दोन्ही पक्षांना आपल्या दबावाखाली ठेवणार हे निश्चित आहे कोणत्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात घ्यायचे नाही याची सूचना भाजपने केली आहे. आता त्यानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी वागतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.सध्या तरी युतीचे सरकार अस्तित्वात आले आहे आता यापुढे कोणती आव्हाने आहे ते समजून घेईल मात्र या अगोदरच्या अडीच वर्षाच्या काळातील कामगिरी आणि या पुढची कामगिरी यामध्ये खूप फरक असणार आहे. नेतृत्व बदलणे की सर्वच गोष्टी बदलतात. ज्या पद्धतीने फडणवीस यांनी आपले विचार मांडले होते, त्यातील महत्त्वाचे शब्द हेच आहेत की चार गोष्टी आपल्या मनासारखे होतील पण चार गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होऊ शकतात. यातूनच आगामी काळामध्ये काय होऊ शकते याची कल्पना कदाचित शिंदे आणि पवार यांना आली असावी. जेव्हा अजित पवार यांना महायुतीत सामावून घेण्यात आले त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड टीका झाली आणि नाक मुरडण्यात आली.भाजप मधीलच अनेकांनी यासाठी विरोध केला होता.
परंतु आत्ता एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना यांचे राजकीय वर्तन पाहता अजित पवार किती महत्त्वाचे ठरणार आहेत याची एक झलक पाहावयास मिळाली.तूर्तास नव्या सरकारला आमच्या शुभेच्छा

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

Must Read

©2024 Live Kokan Express All Right Reserved.