समाजकल्याण विभागाचे भक्कम पाठबळ – सहाय्यक आयुक्त दीपक घाटे
रत्नागिरी, (जिमाका) : ‘किन्नर अस्मिता स्वयंसहाय्यता’ हा जिल्ह्यातील पहिला बचत गट स्थापन करुन, समाजाबरोबर येण्याचे पहिले पाऊल टाकण्यात आले आहे. समाज कल्याण विभागांच्या सर्व योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. समाज कल्याण विभाग निश्चितच अशा उपक्रमास भक्कम पाठबळ देईल, अशी ग्वाही समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली.
केंद्र व राज्य शासन पुरस्कृत दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान रत्नागिरी नगरपरिषद अंतर्गत किन्नर अस्मिता स्वयंसहाय्यता बचत गट या जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथीयांच्या बचत गटाची स्थापना काल झाली. यावेळी शहर अभियान व्यवस्थापक संभाजी काटकर, समुदाय संघटक सारिका मिरकर, संपदा सावंत, माजी नगरसेवक सुहेल मुकादम, अश्फाक गारदी, जान्हवी जाधव, शिवानी पवार, हेमाली कीर, निकीता जगताप, मानसी शिरवाडकर, श्रध्दा शिंदे, दुर्गा सावंत, विद्या गोठणकर, सान्वी कांबळे, किन्नर समुदायाच्या गुरु निता केने, रेणुका चव्हाण, अनुराधा चव्हाण उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते म्हणाले, हा बचत गट स्थापन करत राज्यात इतर जिल्ह्यांसाठी आदर्शवत पाऊल टाकण्यात आले आहे. या निमित्ताने उपेक्षित असणारा वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडला जात आहे. भविष्यकाळातही सगळ्यांच्या सोबतीने निश्चितच प्रेरणादायी काम करु या. प्रशासनाच्या माध्यमातून विविध समस्या सोडविण्यासाठी सर्वजण आपल्या सोबत असतील.
माजी नगरसेवक श्री. मुकादम यांनीही विविध योजना राबविण्यासाठी आणि विविध व्यवसायांसाठी भक्कम आधार दिला जाईल, असे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पुजन आणि दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. श्री. गारदी आणि श्रीमती मिरकर यांनी यावेळी प्रस्तावना केली. बचत गटाच्या अध्यक्ष पल्लवी परब आणि माऊ कदम यांनी स्वागत केले. शेवटी पल्लवी परब यांनी सर्वांचे आभार मानले. संपदा सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.