नेत्यांनी ऑफर देऊनही ‘वेटिंग लिस्ट’ वर
चिपळूण – या आठवड्यात शिवसेनेचे माजी आमदार व कट्टर शिवसैनिक राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून जिल्ह्यामध्ये अन्य काही नेते ‘वेटिंग लिस्ट’ वर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे
गेले काही दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये बदल होण्याची चर्चा सुरू आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेमध्ये उबाठा गटाचे काही नेते येणार असल्याचे सुतोवाच केल्यानंतर या चर्चेला आणखी दुजोरा मिळालेला आहे.मात्र त्याचबरोबर भाजपमध्येही उबाठा पक्षाचे काही नेते जाण्याची शक्यता असून यामध्ये गेले काही दिवस ज्यांची चर्चा सुरू आहे ते उबाठाचे माजी आमदार व उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती मानले जाणारे राजन साळवी हे या आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.त्याचबरोबर खेडचे माजी आमदार व उबाठा गटाचे नेते संजय कदम हेही भाजपामध्ये जाण्याची चर्चा आहे. संजय कदम यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर अलीकडेच एक बैठक झाल्याचे समजते.संजय कदम यांचाही मोठा प्रवेश होणार असल्याचेही सांगितले जात आहे.
चिपळूण तालुक्यातील महाविकास आघाडीचे दोन नेते हे युतीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे यामध्ये सचिन कदम हे शिवसेना( शिंदे)पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीचा एक नेता भाजपमध्ये जाण्याच्या प्रयत्नात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.भाजपमध्ये इन्कमिंगसाठी जी ऑफर देण्यात आली आहे त्याबाबतही आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे.भाजपने या सर्व इच्छुकांना ‘वेटिंग लिस्ट’ वर ठेवले असून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकपूर्वी किंवा नंतर प्रवेश द्यायचा का या विषयावर निर्णय होणे बाकी असल्याचे खात्रीलायकरित्या समजते