रन फॉर बायोडायव्हर्सिटी अशी संकल्पना आहे. ५ किमीसाठी ७० मिनिट, १० किमी १२० मिनिटात आणि २१ किमी अंतर २१० मिनिटांत पूर्ण करायचे आहे
रत्नागिरी : कोकणवासीयांनी कोकणवासीयांची संपूर्ण जगासाठी आयोजित केलेली मॅरेथॉन असं जिला संबोधलं गेलंय त्या कोकण कोस्टल मॅरेथॉनमधील धावपटूंच्या स्वागतासाठी ९ गावांतील ग्रामस्थ, विद्यार्थी उत्सुक आहेत. ग्रामस्थ ढोल वाजवून, गाणी लावून स्वागत करणार आहेत. मुले फुलं उधळणार असून सरपंच, ग्रामस्थ, मानकरी मार्गाच्या दुतर्फा उभे राहून स्वागत करणार आहेत.
नाचणे, काजरघाटी, सोमेश्वर, वेसुर्ले, कोळंबे, फणसोप, भाट्ये गावातून धावपटू २१ किलोमीटरचा मार्ग पूर्ण करणार आहेत. ५ जानेवारीला ही स्पर्धा होणार आहे. ५ किमी, १० किमी आणि २१ किमी अंतर असलेली कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन सालाबादप्रमाणे सुवर्णसूर्य फाउंडेशनने आयोजित केली आहे.
विजेत्यांना ४ लाख ५० हजार रुपयांची रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. रन फॉर बायोडायव्हर्सिटी अशी संकल्पना आहे. ५ किमीसाठी ७० मिनिट, १० किमी १२० मिनिटात आणि २१ किमी अंतर २१० मिनिटांत पूर्ण करायचे आहे. स्पर्धेची सुरवात थिबा पॅलेस रोडवरील हॉटेल मथुरा येथून होईल. २१ किलोमीटरसाठी नाचणे, काजरघाटी, सोमेश्वर, वेसुर्ले, कोळंबे, फणसोपमार्गे भाट्ये समुद्रकिनारा असा मार्ग आहे. १० किमीसाठी नाचणे, शांतीनगर व वळसा मारून मारुती मंदिर मार्गे भाट्ये आणि ५ किमीसाठी मारुती मंदिर, नाचणे पॉवर हाऊस येथून वळून पुन्हा त्याच मार्गाने भाट्यापर्यंत स्पर्धक येतील.
रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने होत असणारी ही मॅरेथॉन आहे. स्पर्धेकरिता महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. तसेच हॉस्पिटॅलिटी पार्टनर रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशन असून रूट पार्टनर रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आहे. स्वच्छता पार्टनर रत्नागिरी नगरपरिषद आहे. अनबॉक्स हे या उपक्रमाचे H2O पार्टनर आहेत. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, आमदार शेखर निकम, राज्यमंत्री योगेश कदम यांच्या माध्यमातून देखील या उपक्रमाला भरीव प्रोत्साहन मिळाले आहे. सुरस स्नॅक्स या उपक्रमाचे एक्सपो फ़ूड पार्टनर आहेत, बॅंक ऑफ इंडिया, पितांबरी प्रॉडक्टस, आर्यक सोल्यूशन्स यांचेही बहुमोल सहकार्य या मॅरेथॉन ला लाभले आहे.