परशुराम घाटातील थरारक घटना
कारची तोडफोड ;तिघांना अटक सात फरार
चिपळूण – रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष साजिद सरगुरोह याने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका कारवर परशुराम घाटामध्ये हल्ला करून कारची तोडफोड करीत तिघांना जखमी केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आले असून साजीद सरगरहो याचेसह सातजण फरार असल्याचे कळते.
- सविस्तर वृत्तानुसार खेड तालुक्यातील मेटे मोहल्ला येथे घडलेल्या एका मुलीच्या वादाप्रकरणी सामंजस्याने सलोखा करण्यासाठी गोवळकोट येथे आलेल्या चारजणांच्या गाडीवर परत जाताना परशुराम घाटात हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना शुक्रवार दि. ६ डिसेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या दरम्याने घडली. या प्रकरणी दहा पैकी तीन आरोपींना पोलिसांना अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी असलेला साजिद सरगुरो याच्यासह अन्य सात आरोपी फरार असल्याचे समजते.
- गुरुवार दि.५ डिसेंबर रोजी रात्री एका मैत्रिणीने बोलवले म्हणून घाणेखुंट गवळवाडी येथील लारीक शहा व त्याचा मित्र मेहुल सावंत हे दोघे मोटार सायकलने मेटे मोहल्ला येथे गेले असता त्यांना तेथे मारहाण करण्यात आली होती. यावेळी तेथे त्यांचे आई, मामा साजिद सरगुरोह व इतर लोक गेले असता त्यांच्यातही वादावादी व मारहाण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तारीकच्या आईने तिघांविरुद्ध तक्रार दिली आहे. आपण आपसात हे प्रकरण मिटवू, असे मामा साजिद सरगुरोह यांना मेटेतील काही लोकांनी सांगितल्यानुसार ते शुक्रवारी सायंकाळी एका कारने (क्र. एमएच ०८ बीइ ०९३५) गोवळकोट येथे ते आले. तेथे चर्चा झाली, परंतु तोडगा निघत नव्हता. यावेळी साजिदच्या घराजवळ गर्दी जमली आणि काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस घटनास्थळी गेले, त्यांनी गर्दी पांगवली व संबंधितांना निघून जाण्यास सांगितले. मेटे मोहल्ल्यातील मुनावर बोट, उस्मान झगडे, महंमद अली व अन्य एकजण कारने परत जात असताना साजिद सरगुरोह आणि इतरांनी परशुराम घाटात फिल्मी स्टाईलने गाडी आडवी लावून त्यांची कार अडवली. या वेळी काहींनी कारच्या काचा फोडून हल्ला केला व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. एकाने लोखंडी रॉड मारल्याने मुनावर बोट याच्या हाताला लागून हात फ्रॅक्चर झाला, तर उस्मान झगडे व महंमद अलीच्या नाकाला व छातीला दुखापत झाली. अचानक दहा बराजणांचा जमाव चाल करुन आल्याने कारमधील सर्व घाबरले होते. या हाणामारीची बातमी समजताच पोलीसही घटनास्थळी पोहचले. या प्रकरणी मुनावर अहमद बोट (रा. मेटे मोहल्ला, खेड) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात आरोपी साजिद सरगुरोह, शाहीद सरगुरोह, फैजल मेमन, मोईन पेचकर, महंमद खान, फहद उर्फ पोक्या खान, निहाल अलवारे, शाहबाज दळवी, मुजफ्फर इनामदार, हनीफ रुमानी यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
- तक्रारीवरुन पोलिसांनी निहाल अलवारे, शाहबाज दळवी, मुजफ्फर इनामदार या तिघांना अटक केली. या तिघां संशयितांना काल न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. साजिद सरगुरोहसह अन्य सातजणांचा शोध पोलीस घेत असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास जाधव करीत आहेत.
- अशा प्रकारे खुलेआम गुंडागर्दी करून दहशत निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
- संशयीत साजिद हा काँग्रेस पक्षाचा मार्गदर्शक असल्याचे सांगितले जाते व तो विरोधी पक्षाच्या व महाविकास आघाडीच्या लोकांना सल्ले द्यायचेही काम करत आहे.