चिपळूण
रूढी-परंपरेनुसार शतक पार करणाऱ्या श्री क्षेत्र टेरव येथील हनुमान मंदिरात घटस्थापना व विधिवत वीणापूजन करून वीणा चढवून हरिनाम सप्ताहाचा आनंद सोहळा नुकताच संपन्न झाला.
वारकरी सांप्रदायाच्या परंपरेनुसार मंगलमय काकड आरती, संध्याकाळी हरिपाठ व त्या नंतर नामांकित किर्तनकार ह. भ. प. सर्वश्री जनार्दन आंब्रे, सतीश सकपाळ, अरुण जाधव, अरविंद चव्हाण, दिपक साळवी, विलास मोरे आणि भागवत भारती महाराज यांच्या श्रवणीय कीर्तनांचे आयोजन करण्यात आले होते. मृदुंग व भजनाची श्रवणीय व लयबद्ध साथ श्री रोशन चव्हाण व धरकरी श्री राम साळवी व पराग जाधव यांनी दिली. तसेच रात्रौ हरी जागर करण्यात आला. सतत सात दिवस हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हरिनाम सप्ताहच्या या कार्यक्रमात समस्त ग्रामस्थ- भाविकानी आनंदाने सहभागी होऊन अखंड सेवा अर्पण केली.
सप्ताहाची सांगता ह.भ. प. श्री अरविंद चव्हाण महाराज, यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली. त्यानंतर हंडी फोडून काला करण्यात आला व घट हालवून विधीवत पूजा करून वीणा उतरविण्यात आला. ग्रामस्थ बंधू भगिनींनी दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन ज्ञानोबा माऊली तुकाराम नामाचा गजर करून परिसर मंगलमय केला. सप्ताह समाप्तीचे धार्मिक विधी पार पडल्यानंतर भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. अखंड हरिनाम सप्ताहात जात – पात, गरीब – श्रीमंत असा भेदभाव न करता फक्त आणि फक्त भक्तिभाव जपला जातो आणि हाच भक्तीभाव प्रत्येकाला जगण्यासाठी ऊर्जा देतो, त्यामुळे अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून समाजप्रबोधन होणे ही काळजी गरज आहे असे मत मान्यवर कीर्तनकारानी मांडले.
हरिनाम सप्ताह दरम्यान सहकार्य करणाऱ्या सर्व संबंधितांचा देवस्थान व टेरव ग्रामस्थांच्या वतीने मंदिर सभागृहात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून यथोचित सन्मान करण्यात आला.
सर्व भाविक, बंधू-भगिनीनी या उत्सवात सहभागी होऊन नामज्ञान यज्ञाचा लाभ घेतल्या बद्दल ग्रामस्थांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.