वाशिष्ठी डेअरी आयोजित कृषी महोत्सव लक्षवेधी ठरणार!
चिपळूण (प्रतिनिधी):– वाशिष्ठी डेअरीच्यावतीने शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर आयोजित कृषी महोत्सव लक्षवेधी ठरणार आहे. या महोत्सवात पशुधन आकर्षण ठरणार असून खिल्लार बैल राजा, वाशिष्ठीचा राजा सोना रेडा, गजेंद्र रेडा, पंढरपुरी म्हैस, हिंदकेसरी बैल, भारत बैल, बकासुर बैल असे नामवंत पशुधन या कृषी महोत्सवात सहभागी होणार असल्याने शेतकऱ्यांसाठी कृषी महोत्सव पर्वणीच ठरणार आहे. या महत्त्वाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आले असून या तयारीचा वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी गुरुवारी सायंकाळी आढावा घेतला.
- गेल्या वर्षी आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर यावर्षी देखील दिनांक ५ जानेवारी ते ९ जानेवारी दरम्यान कृषी व पशुधन कृषी महोत्सव २०२५ चिपळूण शहरातील बहादूरशेखनाका येथील स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर मैदानात आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवात पशुधन, डॉग- कॅट, गोड पदार्थ पाककला, तिखट पाककला अशा स्पर्धा होणार आहेत. तसेच महिला बचत गटांसाठी मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचबरोबर शेतीपूरक कृषी विषयक स्टॉल्स असल्याने हे महोत्सव शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची देखील मेजवानी असणार आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली असून गुरुवारी सायंकाळी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी आढावा घेतला.
पशुधन महोत्सवात असणार आकर्षण
या महोत्सवात खिल्लार बैल राजा नाशिक ९०० किलो वजनाचा, साडेपाच फूट उंची, राजा कोंबडा (बारामती ) एक वर्षाचा, सहा किलो वजनाचा, वाशिष्ठीचा राजा सोना रेडा, गजेंद्र रेडा, कोंबडी (३०० अंडी), घोडे, पंढरपूरी म्हैस ६ फूट लांबीची, हिंद व भारत केसरी, बकासुर, बलमा बन्या बैल असे नामवंत बैल सहभागी होणार असल्याने महोत्सव लक्षवेधी ठरणार आहे.
या महोत्सवात कोकणी दर्शन व्हावे तसेच नवीन पिढीला शेती विषयक माहिती मिळावी यासाठी या महोत्सवाचे प्रवेशद्वार बांबूच्या लाकडापासून बनवण्यात आले आहे. याचबरोबर माचाळ, गोठा, झोपडी उभारण्यात आली आहे. एकंदरीत पूर्वीचा लूक या महोत्सवाला देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.