चिपळूण : मध्यंतरीच्या काळात अतिशय सक्षमपणे काम करणारी अखिल भारतीय नाट्य परिषदेची चिपळूण शाखा काही तांत्रिक कारणामुळे बंद पडली, परंतु नव्याने ती सुरू करण्यात आली. अवघ्या वर्षभरातच या शाखेने विविध उपक्रम राबवले आहेत. कमी कालावधीत चिपळूणची शाखा सक्षम झाल्याचे समाधान आहे, अशी भावना अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष, अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केली.
चिपळूण येथे गेला माधव कुणीकडे, या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त आलेल्या प्रशांत दामले यांनी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रातील अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखा कार्यालयाला भेट दिली. या ठिकाणी अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला चिपळूण शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, उपाध्यक्ष दिलीप आंब्रे, योगेश बांडागळे, सचिव डॉ. मीनल ओक आदी उपस्थित होते.
या वेळी प्रशांत दामले यांनी उपस्थित कार्यकारिणी सदस्यांना मार्गदर्शन केले. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीमध्ये नाट्य परिषदेचे कार्यालय आहे. त्यामुळे नाट्यगृहावर लक्ष ठेवणे, ही आपलीही जबाबदारी आहे. नाट्यगृह स्वच्छ राहिले पाहिजे. येथील वस्तूंची काळजी घेतली पाहिजे, ही जबाबदारी नाट्यप्रेमींसह नाट्य परिषदेचीही असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी वर्षभरात नाट्य परिषदेच्या सहयोगाने आयोजित केलेली दोन नाटकं, पुरुषोत्तम करंडक, लोककला महोत्सव, बालनाट्य शिबीर, अशा विविध उपक्रमांची माहिती देतानाच आगामी उपक्रमांची माहिती दिली. या वेळी नाट्य परिषदेच्यावतीने अभिनेते प्रशांत दामले यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर चिपळुणातील नाट्य चळवळीला बळ देणारे मुख्याधिकारी विशाल भोसले यांचाही अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते नाट्य परिषद शाखा चिपळूणच्यावतीने सत्कार करण्यात आला. या बैठकीला कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. डॉ. मीनल ओक यांनी सर्वांचे आभार मानले.