सपत्नीक घेतले शिवसेना नेते आ. भास्करशेठ जाधव यांचे आशीर्वाद
चिपळूण :– राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी आपली पत्नी सौ. स्वप्ना यादव यांच्यासह शिवसेना नेते माजी मंत्री आमदार भास्करशेठ जाधव यांची त्यांच्या पाग येथील निवासस्थानी जाऊन आशीर्वाद घेतले.
शिवसेना नेते आमदार भास्करशेठ जाधव हे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर मुंबईत शिवतीर्थावर झालेल्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईत गेले. तेथून ते खूप दिवसांनी परत चिपळूणमध्ये आले असता राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
याविषयी यावेळी यादव यांनी आमदार जाधव यांच्याशी सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत सखोल चर्चा केली व राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून संधी मिळाल्यास आपला संपूर्ण पाठिंबा देण्याची मागणी केली. आमदार जाधव यांनीही याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून या दोन नेत्यांमध्ये लवकरच पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे. दरम्यान पूर्वी शिवसेनेच्या संघर्षाच्या काळात श्री. यादव व आमदार जाधव यांनी शिवसेनेत एकत्र काम केले असल्याने त्या आठवणीही ताज्या झाल्या. श्री यादव व जाधव यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव उपस्थित होते.