गेले कित्येक दिवस पडत असलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने राजापूर तालुक्यात भातशेती धोक्यात आली असून शेतकर्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. अनेक ठिकाणी भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. तरी शासनाने कोकणात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश गुडेकर यांनी शेतकर्यांच्यावतीने केली आहे.यंदा सुरूवातीपासूनच पाऊस चांगला झाल्याने भापशेती चांगली होती. शेतकरीराजा खूष होता. मात्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. पावसाने भातशेती पूर्णपणे आडवी झाली असून शेतकरीवर्गाच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फेरले आहे. भातशेती आडवी झाल्याने भाताला मोड आले असून अनेक ठिकाणी भातशेती पूर्णतः कुजली आहे. त्यामुळे शेतकरी या अस्मानी संकटाने उध्वस्त झाला आहे. काही ठिकाणी नाचणी पिक देखील आडवे झाले आहे. शेतकर्यांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होवून देखील प्रशासन तथा कृषी विभागाने याकडे दुर्लक्षच केले आहे.