मुंबई – कोकणात एके काळी जलमार्ग हे प्रवासाचे मुख्य साधन होते. कालानुरुप त्याची जागा रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतुकीने घेतली. मात्र, त्याला जलमार्गांची सर नाही, हे प्रत्येक कोकणवासीय मान्य करेल. त्यामुळे कोकणवासीयांच्या इच्छापूर्तीसाठी किनारपट्टीलगतच्या बंदरांचा विकास करून जलमार्गांचे जाळे विस्तारले जाणार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर कोकणाकडे बंदरे विकास मंत्रालय आल्यामुळे चाकरमान्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांच्याकडे बंदरे विकास मंत्रालयाचा कार्यभार दिला आहे, ते मुळात कोकण किनारपट्टी भक्कम करण्यासाठीच. आजवर दुर्लक्षित असलेल्या बंदरांचा विकास करून तेथे रोजगारक्षम पर्यटन उभे करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. त्यासाठी पर्यटन धोरणही तयार करण्यात आले आहे. मात्र, जोवर बंदरांचा विकास होत नाही, तोवर पर्यटन धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे होऊ शकणार नाही. त्यामुळे कोकणातील एका युवा नेतृत्वाकडे या खात्याची जबाबदारी देत कोकणाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
राज्यात उपलब्ध असलेल्या सागरी किनारपट्टीचा पर्यटनासाठी वापर करण्याकरिता ‘क्रूझ पर्यटन’ निर्माण करण्यात यावे, असे पर्यटन धोरणात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये अलिबाग, मुरुड-जंजिरा, गणपतीपुळे, तारकर्ली आणि दापोली यांसारख्या किनारपट्ट्यांवरील ठिकाणांचा समावेश आहे. खारफुटी, प्राचीन मंदिरे, सागरी किल्ले, सागरी गुहा इत्यादी स्थळांनाही त्यात अंतर्भूत करण्यात आले आहे.
कोकणातील भूमिपूत्र असल्याने मला येथील स्थानिक प्रश्नांची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे या खात्याची जबाबदारी दिली आहे. कोकण किनारपट्टीचा विकास करताना, रोजगारनिर्मितीवर अधिकाधिक भर देण्याकडे कल असेल. स्थानिक पातळीवर रोजगारसंधी उपलब्ध करून युवकांच्या हाताला काम देण्याची संधी यानिमित्त माझ्याकडे चालून आली आहे. या संधीचे मी सोने करेन, असे विधान नितेश राणे यांनी केले.