देवरुख- चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी चिपळूण-संगमेश्वर-देवरुख शहरासह ग्रामीण भागात गावभेट दौरा तसेच प्रचार फेरी आणि डोअर टू डोअर असे प्रचाराचे रान उठवत महाविकास आघाडीने संपूर्ण वातावरण ढवळून काढले आहे.
प्रचाराला मिळणारा प्रतिसाद पाहता चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात ‘तुतारी’ चा आवाज घुमताना दिसत आहे. तर ‘परिवर्तन करूया, तुतारी वाजवूया’, असा सूर ऐकावयास मिळत आहे. एकंदरीत चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसून येत आहे.
विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने प्रचारात रंगत येऊ लागली आहे. चिपळूण- संगमेश्वर मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होत आहे. महायुती कडून शेखर निकम तर महाविकास आघाडीकडून प्रशांत यादव मैदानात उतरले आहेत. या मतदारसंघात चिपळूण तालुक्यात १५१ बूथ तर संगमेश्वर तालुक्यात १४९ बूथ आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील मतदान काही प्रमाणात समसमान आहे. तरीही कोणत्या उमेदवाराला किती मताधिक्य मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारार्थ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सरसावले आहेत. गावभेट दौरा, प्रचार फेरीमधून प्रचाराचा धुरळा उडवला आहे. प्रचार पत्रके वितरीत केली जात आहेत. विशेष म्हणजे परिसरात ‘तुतारी’ वाजवून मतदारांचे लक्ष वेधले जात आहे. एकंदरीत यावेळी महाविकास आघाडीची भक्कम अशी एकजूट दिसून येत होती. या प्रचार फेरीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.
पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक देखील स्वतः सहभागी होऊन प्रचार करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांच्या सभा होणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असून प्रचाराचा धुरळा उडणार आहे.