चिपळूण (प्रतिनिधी):–ः राज्यात महायुतीने फोडाफोडीचे राजकारण करून अंदाधुंदी कारभार केल्याने सामान्य जनतेच्या मनात संतापाची भावना आहे. राज्यात बदल व्हावा ही लोकांची भूमिका आहे. महाविकास आघाडीने सर्व जाती धर्माला सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका घेतली आहे. आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव हे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून सर्वसामान्य तरूणांना न्याय देण्याची भूमिका घेत असल्याचे मत रिपल्बीकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
येथील रिपल्बीकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांची शहरात बैठक झाला. या बैठकीला जिल्हाध्यक्ष मुझफ्फर मुल्लाजी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर जिल्हाध्यक्ष मुल्लाजी व सहकारी पदाधिकारी म्हणाले, देशात मोदी सरकारने खोटी आश्वासने दिली. काही वर्षापुर्वी लोकांना अच्छेदिन ची आशा दाखवली. लोकांनी विश्वास ठेवून त्यांना सत्तेत बसवले. परंतू गेल्या काही वर्षात जनसामान्य लोकांच्या जिवनात कोणताही बदल झालेला नाही. अच्छे दिन सोडाच उलट लोकांना वाढत्या महागाईला तोंड द्यावे लागले. राज्यात फोडाफोडीचे राजकारण करून सुडाचे राजकारण केले. सत्तेच्या हव्यासापोटी झालेले राजकारण लोकांना पटलेले नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांनी मतदार संघात काम करून दाखवले. डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध करून दिला. यातून शेतकऱ्यांची उन्नतीच होत आहे. पतसंस्थेसह डेअरीच्या माध्यमातून स्थानिक तरूणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची साधने, पुरक व्यवसाय उपलब्ध झाले आहेत.
यामुळे विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या विजयासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. येत्या निवडणूकीत महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल, असा आशावाही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी युवानेते संदेश मोहिते, संदीप पवार, केतन मोहिते, चंद्रसेन मोहिते, मंदार मोहिते, प्राची मोहिते, मुमताज दलवाई आदी उपस्थित होते.