रत्नागिरी – येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत संघटनात्मक कार्याला चालना देतानाच कार्यकर्त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला. शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात, जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीत चिपळूण उपशहर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल मनोज पांचाळ यांचा तसेच चिपळूण तालुका प्रसिद्धीप्रमुख सचिन चोरगे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यास उपजिल्हा प्रमुख तथा समन्वयक रवींद्र डोळस, जिल्हा संघटक तथा जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, शिव सहकार सेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, रत्नागिरी विधानसभा संपर्कप्रमुख सुदर्शन तोडणकर, युवासेना सहसचिव प्रदुम्न माने, जिल्हा युवा अधिकारी प्रसाद सावंत तसेच राजापूर विधानसभा क्षेत्र संघटक रामचंद्र उर्फ तात्या सरवणकर या रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह चिपळूण शहर प्रमुख श्री सचिन उर्फ भैय्या कदम, चिपळूण उपशहर प्रमुख श्री राजन खेडेकर व चिपळूण शहर सचिव श्री. प्रशांत मुळ्ये यांची उपस्थिती लाभली.
या प्रसंगी कार्यकर्त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देणे हीच संघटन बळकटीची खरी गुरुकिल्ली असल्याचा संदेश देण्यात आला.