खेड नगर परिषदेने स्वच्छ भारत अभियान २० अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियान प्रभावीपणे राबविण्यावर भर देत शहर कचरामुक्त करण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी स्वच्छता कर्मचारी दिवस-रात्र राबत आहेत. मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांमध्येही स्वच्छतेविषयी व्यापक जनजागृती केली जात आहे.एकीकडे कचरा प्रकल्पाअभावी कचर्याची विल्हेवाट लावायची कुठे? हा यक्षप्रश्न नगर परिषदेस सतावत असला तरी दिवसाकाठी जमा होणार्या कचर्याच्या विल्हेवाटीसाठी नानाविध क्लृप्त्यांचा अवलंब केला जात आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत केवळ स्पर्धा म्हणून नव्हे तर लोकचळवळ करण्यावर नगर परिषदेने विशेष भर देत स्वच्छतेविषयक जागृती करण्यात येत आहे. येथील नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी परिसर चकाचक करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.