- चिपळूण – स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये चिपळूण नगरपरिषदेने राज्यात १४ वा तर कोकण विभागात पहिला क्रमांक पटकावून मोठे यश मिळवले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चिपळूण शहर वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय अधीक्षक, आरोग्य विभागाचे अधिकारी व सर्व स्वच्छता कर्मचारी यांचे देखील मनःपुर्वक आभार मानले.
यासोबतच विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बाळा कदम यांचे मार्गदर्शनाखाली व उपशहर प्रमुख सचिन उर्फ भैया कदम यांचे नेतृत्वात चिपळूण शहरातील नागरी समस्यांबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले.
या निवेदनात
१) वाशिष्टी नदीचा जुन्या पुलाखाली मार्कंडी, कावीळतळी, मतेवाडी, गांधीनगर, रावतळे, ओझरवाडी, परशुराम नगर, बाळकृष्ण नगर व राधाकृष्ण नगर या भागातील लोकांच्या साधारण हजार ते बाराशे घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन दरवर्षी येथील घाटावर होत असते.
पण सदर पूल जुना झाला असलेले तो तोडण्यात आलेला आहे त्यामुळे नमूद भागातील श्री गणेश मूर्तीचे विसर्जनांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यावर चिपळूण नगर परिषदने लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करावी जेणेकरून श्रीभक्तांना त्रास होणार नाही.
२) शहरातील मुख्य बाजारपेठ, चिंचनाका, अजिंक्य आर्केडजवळचा रस्ता, खाटीक आळी परिसर, गोवळकोट रोड, वांगडे मोहल्ला, पेठमाप, रॉयलनगर, प्रभात रोड आदी ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.
पाग बौद्धवाडी ते वीरेश्वर कॉलनीकडे जाणाऱ्या जोडरस्त्यावर केवळ चार दिवसांपूर्वी खड्डे भरण्यात आले होते, मात्र तेच खड्डे पुन्हा नव्याने पडले आहेत.
अपुऱ्या आणि अल्पायुषी डागडुजीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. आता यावर कायमस्वरूपी उपाययोजना करून टिकाऊ डांबरीकरण झाले पाहिजे.
३) चिपळूण शहरात यावर्षी डास प्रतिबंधक औषध फवारणी अजिबात झालेली नाही. त्यामुळे नागरिकांचा डेंग्यू, मलेरिया अशा आरोग्यविषयक समस्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे तरी सदर फवारणी ताबडतोब करण्यात यावी.
४) त्याचप्रमाणे शहरातील अंतर्गत पाखाड्यांवर तसेच अन्य पायवाटांवर शेवाळ साचलेले आहे त्यामुळे पायी चालत असताना नागरिकांचे पाय घसरून छोटे-मोठे अपघात होत आहेत. तरी सदर पाखाड्यांवर तसेच जिथे जिथे शेवाळ साचलेले आहे अशा पायवाटांवर ब्लिचिंग
पावडर टाकण्यात यावी.
५) चिपळूण शहरात भटकी कुत्री व मोकाट जनावरे यांचा खूप उच्छाद मांडला आहे. त्यामुळे वाहन चालक व पादचारी तसेच वृद्ध आणि महिला वर्ग व लहान मुले यांना याचा धोका आहे. अशा भटक्या कुत्र्यांवर लवकरात लवकर निर्बीजीकरण करण्यात यावे व मोकाट जनावरांच्या आसऱ्याची योग्य ती व्यवस्था करावी.
चिपळूण शहरातील या नागरी समस्या चिपळूण नगर परिषद मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी गांभीर्याने ऐकून घेतल्या व ताबडतोब कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी क्षेत्र प्रमुख बाळा कदम, तालुका प्रमुख बळीराम गुजर, तालुका संघटक राजू देवळेकर, उपशहर प्रमुख सचिन उर्फ भैया कदम, मिथिलेश उर्फ विकी नरळकर, संजय रेडीज, राजू विखारे, संतोष पवार, रियान मालदार, माजी नगरसेवक मनोज शिंदे, युवा सेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, शहर सचिव प्रशांत मुळये, महिला शहर संघटिका वैशाली शिंदे, तालुका सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, बापू चिपळूणकर, समीर राऊत, संदेश किंजळकर, उदय शेठ ओतारी, मनोज पांचाळ, निलेश आवले, शंकर कदम, संजय गोताड, नितेश चिपळूणकर, ओंकार गायकवाड, महेश पडवेकर, सचिन पडवेकर, गणेश खेतले, किशोर राऊत, हर्षाली पवार, तेजस्वी किंजळकर, सायली कदम, श्रद्धा घाडगे, गणेश खेतले व बहुसंख्य शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.