यंदा ऑक्टोबर महिन्याचा मध्य आला तरी जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. यामुळे आंबा उत्पादन लांबणीवर पडणार असल्याने जिल्ह्यातील आंबा उत्पादकांना अपेक्षित दर मिळणे कठीण होणार आहे. यामुळे आंब्यावर अर्थकारण अवलंबून असणार्या आंबा बागायतदारांचे आर्थिक गणित यंदाच्या पावसामुळे कोलमडणार आहे.आंब्याच्या झाडाला पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात ताण मिळणे गरजेचे असते. हा ताण ऑक्टोबर महिन्यात वेळेत मिळाला तर त्याला फुलोरा येण्यास मदत होते. मात्र यावर्षी ऑक्टोबर महिना अर्धा सरला तरी जिल्ह्यामध्ये पावसाच्या धारा कोसळत आहेत. यामुळे यावर्षी ऑक्टोबर महिन्यात आंब्याच्या झाडांना ताण मिळणे दुरापास्त झाले आहे. याचा विपरित परिणाम होवून आंबा पीक लांबणीवर पडणार आहे. आंबा पीक लांबणीवर पडल्यामुळे मुंबईच्या बाजारात व परदेशात आंब्याला असणारा अपेक्षित दर मिळणार नाही. यामुळे आंबा बागायतदार पुरता धास्तावला आहे.