भाजपा उत्तर रत्नागिरी तर्फे प्रशांत यादव यांच्यासह प्रवेशकर्त्यांचा सत्कार
चिपळूण (प्रतिनिधी):– भाजप पक्षाला आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख नेतृत्वात तसेच आपले मार्गदर्शक तथा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे आणि मत्स्य व्यवसाय, विकास बंदरे तथा संपर्क मंत्री ना. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण उल्लेखनीय काम करूया. तसेच अंतर्गत स्नेह आणि सुसंवाद वाढवू. तुम्ही कधीही हाक द्या, मी आपल्यासाठी धावून येईन. कारण, प्रश्न कोकणच्या सर्वांगीण विकासाचा आहे. त्यामुळे विविध उपक्रम व कार्यक्रम हाती घेऊन पक्षाला अभिमान वाटेल असे काम उभे करूया, असे आवाहन भाजपा पक्षात नव्याने दाखल झालेले तथा उद्योजक प्रशांत यादव यांनी केले.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी सुमारे १६०० समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यादव यांच्या प्रवेशाने चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे बळ वाढले आहे.
भाजपा उत्तर रत्नागिरीतर्फे चिपळूण शहरातील शिक्षक पतपेढी सभागृहात प्रशांत यादव यांच्यासह अन्य प्रवेशकर्त्यांचे स्वागत कार्यक्रम व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. उद्योजक प्रशांत यादव यांच्यासह बळीराम मोरे, चिपळूण तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के आणि अभिनव भुरण यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रशांत यादव यांनी आपल्या मनोगतात अवघे कोकण भाजपमय करण्यासाठी एकदिलाने काम करूया. नव्या जोमाने पक्ष संघटन वाढवू. त्यासाठी आपले सहकार्य, साथ आणि पाठिंबा असू द्या, असे आवाहन केले. तसेच अतिशय प्रेमाने व आपुलकीने हा सत्कार केल्याबद्दल सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे यादव यांनी यावेळी आभार व्यक्त केले.
यावेळी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, गुहागर तालुका माजी अध्यक्ष निलेश सुर्वे, रत्नागिरी जिल्हा माजी सरचिटणीस श्रीराम इदाते, मंडणगड तालुका अध्यक्ष प्रवीण कदम, दापोली ग्रामीण तालुकाध्यक्ष सचिन होडबे, दापोली शहराध्यक्ष जया साळवी, खेड ग्रामीण उत्तर अध्यक्ष ऋषिकेश मोरे, खेड दक्षिण अध्यक्ष विनोद चाळके, चिपळूण पश्चिम अध्यक्ष उदय घाग, गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकर, चिपळूणचे माजी तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित उपस्थित होते.