RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

राज ठाकरेंनी,आपल्याच पक्षातीलकोकणचे ‘वैभव ‘ घालवलं

विशेष संपादकीय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण संघटक तथा सचिव वैभव खेडेकर यांची राज ठाकरे यांनी हकालपट्टी केली. थोडसं, कार्यालयीन भाषेत सांगायचे झाले तर त्यांना ‘बडतर्फ ‘ केले. वैभव खेडेकर यांच्यासारखा कट्टर राज समर्थक म्हणजे जवळपास आयुष्याच्या तीस वर्षाहून अधिक काळ केवळ राज ठाकरे आणि राज ठाकरे आणि राज ठाकरे असा २४ तास जप लावणाऱ्या वैभव खेडेकर यांना अशा प्रकारे पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवणे ही गोष्ट जशी स्वतः खेडेकर यांना अचंबित आणि धक्कादायक आहे, तेवढीच सर्वसामान्य लोकांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना धक्कादायक बाब ठरली आहे. अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून किंबहुना त्या अगोदर विद्यार्थी सेनेपासून ठाकरे यांच्याबरोबर राहणाऱ्या खेडेकर यांचा एवढा मोठा काय ‘प्रमाद ‘ घडला हे स्वतःच खेडेकर यांना माहीत नाही.पण गेले दोन महिने अंतर्गत मोठी धूसफूस सुरू होती, अशा बातम्या प्रसारमाध्यमांमधून येत होत्या. वैभव खेडेकर हे भारतीय जनता पक्षाशी जवळीक साधून आहेत असा संदेश शिवतीर्थावर जात होता. अर्थात वैभव खेडेकर यांनी स्वतः घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या सर्वाचा सविस्तर खुलासा केलेला आहे.आपण मंत्री नितेश राणे यांना भेटलो ही बाब त्यांनी खुलेआम मान्य केली. परंतु त्याचे कारणही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. दुसरा भाग म्हणजे एखाद्या पक्षाच्या काही नेत्यांना भेटलो म्हणजे,पक्ष सोडला किंवा सोडणार असे होत नाही. तीस-पस्तीस वर्षे जो व्यक्ती आपल्या सोबत आहे त्याची मानसिकता आणि त्याचा स्वभाव ठाकरे ओळखत नाही असे होणार नाही. आपल्याच कार्यकर्त्याला किंवा आपल्याच नेत्याला आपण ओळखणार नसेल तर पक्षाची भवितव्याची वाटचाल कशी असेल हे यातून स्पष्टपणे पुढे येत आहे. वैभव खेडेकर यांनी केलेल्या दाव्यानुसार गेले दोन महिने ते राज ठाकरे यांची भेट मागण्यासाठी अनेक प्रयत्न करत होते. किंबहुना ज्यांनी बडतर्फीचे पत्र ( ठाकरेंच्या आदेशाने) दिले ते संदीप देशपांडे आणि जाधव यांच्या माध्यमातूनही त्यांनी राज ठाकरे यांची भेट व्हावी यासाठी बरेचदा प्रयत्न केले. पण भेट झाली नाही आणि थेट बडतर्फीचा लेखी आदेश प्राप्त झाला. बरं हा जो लेखी आदेश प्राप्त झाला, त्यावर स्वतः ठाकरे यांची सही नाही.म्हणजेच आपल्या नेत्याला ‘बेदखल ‘ करून,त्याची ‘किंमत ‘ करून आणि अवमानास्पद वागणूक देऊन बाहेर काढण्यात आले हे दिसूनच येत आहे. संघटना किंवा पक्ष चालवण्याचा हा कुठचा प्रकार आहे किंबहुना आपल्या कार्यकर्त्यांना वागणूक देण्याची ही पद्धत कुठची आहे ? हे आकलना पलीकडचे आहे. राज ठाकरे यांच्या बद्दल सर्वांनीच ‘बाऊ’ करून घेतलेला आहे. प्रसारमाध्यमांनी तर खूपच वेगळी प्रतिमा रंगवलेली आहे. ठाकरे यांचे व्यक्तिमत्व बेधडक, बिंदास. परखड स्पष्ट आणि तोंडावर जे आहे ते बोलणार आहे. त्यामुळे अनेकांना ते भावतात,त्यांच्या कार्यकर्त्यांना ते आवडतात. राजकारणा पलीकडे जाऊन ठाकरे यांचा व्यक्तिमत्व एक कलाकाराचे, साहित्य आणि संस्कृती क्षेत्रामध्ये विशेष रुची राखणारे,कलाकारांमध्ये वावरणार असे आहे. मात्र ठाकरे यांची ही एक चांगली बाजू असताना त्यांच्यातला राजकारणी हा ‘सनकी’आहे.हा सनकीपणा काही गोष्टीबाबत खूप परिणामकारक राहतो.म्हणजे जेव्हा एखादा सामाजिक विषय असतो त्यावेळी राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका घेतलेली निर्णय हे अनेक वेळा योग्य ठरलेले आहेत. त्यामध्ये अलीकडेच सरकारने घेतलेला हिंदी सक्तीचा विषय असो, किंवा मराठी माणसाला न्याय देण्याचा विषय असो,मराठी चित्रपटांना प्राधान्याने थिएटर मिळवून देण्याचा विषय असो, गंगेचा प्रदूषणाचा विषय असो अथवा मुंबईतल्या मराठी माणसाला सपोर्ट करण्याचा विषय असो राज ठाकरे यांचे असे सनकी निर्णय समाजाला त्यांच्या कार्यकर्त्याला भावून गेलेले आहेत. त्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या वक्तव्यामध्येही आखीव रेखीवपणा नसतो ते ठरवून काहीच बोलत नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांचे वक्तृत्व आणि नेतृत्व नेहमीच अनेकांच्या आकर्षणाचा आणि वलयाचा बिंदू ठरलेले आहे. परंतु सामाजिक आणि राजकारण पटलावर आपला स्वभाव आपली भूमिका हा एक वेगळा विषय आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्या नेत्यांमध्ये किंवा आपल्या सहकाऱ्यांमध्ये वागण्याची पद्धत हा एक वेगळा विषय आहे. पक्षाबाहेर आपल्या नेतृत्वाची मानसिकता ही वेगळी असते किंवा असावी परंतु तीच मानसिकता पक्षांतर्गत जर असेल तर मग मात्र अनेक समस्या निर्माण होऊ शकतात आणि मनसेबाबत त्या झालेल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जेव्हा स्थापन झाली तेव्हा त्याचा प्रचंड आकर्षण महाराष्ट्राला होतं आणि म्हणूनच दोन आकडी आमदार पहिल्याच टर्ममध्ये निवडून आले होते परंतु हे सातत्य राज ठाकरे यांना टिकवता आले नाही त्याला अनेक कारणे आहेत त्यामध्ये एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे त्यांचा स्वतःचा हाच स्वभाव. या कारणामुळे राम कदम,शिशिर शिंदे, प्रवीण दरेकर यांच्यासारखी मंडळी त्यांच्यापासून दूर झाली आणि ते वेगळ्या पक्षात स्थिरावरली सुद्धा. अलीकडेच म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पुण्यातीलयांचा आक्रमक कार्यकर्ता तात्या मोरे यांनीही पक्ष सोडला किंबहुना त्यांना बाजूला करण्यात आले. अशा अनेक चांगले तयार झालेले नेतृत्व ठाकरे यांच्यापासून दूर गेले. जेष्ठ पक्षाचे जेष्ठ प्रवक्ते प्रकाश महाजन यांना सुद्धा ठाकरे यांनी जवळपास रडकुंडीला आणले. आकाश महाजन बिचारे सर्वच चॅनलवर अक्षरश: डोळ्यात पाणी आणून ‘माझं काय चुकलं, माझं काय चुकलं ? म्हणून विचारत होते पण कसं काय ते ते पक्षात राहिले हे महाजनांचं नशीब म्हणावं लागेल. कदाचित वैभव खेडेकरांबरोबर ते खेडमध्ये निवेदन द्यायला गेले असावे आणि तेच कारण त्यांना भोवले असावे. अर्थात या सर्व गोष्टी उलट सुलट घडण्याचे कारण म्हणजे या पक्षामध्ये ‘वनवेच ‘ आहे. समोरून मार्ग नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा ‘पक्ष ‘ म्हणून फक्त टेबलावर आहे. राज ठाकरे बोलतील तोच पक्ष तीच भूमिका तोच निर्णय. यामध्ये निर्णयाचं,भूमिकेचं किंबहुना काही ठरवण्याचं विकेंद्रीकरण अजिबात नाही.ज्याला हे पचेल ज्याला हे पटेल तो मनसे कार्यकर्ता अशी साधी आणि सरळ व्याख्या ठेवण्यात आली आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष म्हणून फार तयार झाला नाही. ती संघटनाच म्हणून राहिली आहे. संघटनेला राजकारणामध्ये फार भवितव्य नसते. ठाकरे यांनी फार लोकप्रिय गोष्टी केल्या. त्यातील काही गोष्टी मराठी लोकांसाठी अजूनही आवश्यक आणि गरजेच्या आहेत.पण पक्ष म्हणून त्याचा फायदा किती झाला ? गेल्या वीस वर्षांमध्ये पक्षांमध्ये लोकप्रतिनिधी किती तयार झाले याची आत्मचिंतन राज ठाकरे करतील अशी शक्यता नाही. पक्षाचा आलेख वाढला नसला तरी पक्षामध्ये स्थिरता असणे अपेक्षित असते. तशी स्थिरता दिसत नाही.राज ठाकरे यांना वाटेल तो पक्ष कारण त्यांनी तो पक्ष स्थापन केला आहे म्हणून त्याला तो ‘व्हिटो पॉवर’ आहे. साधारणपणे कोणत्याही पक्षात काही प्रमाणात लोकशाही पद्धत असतेच. ठाकरे ज्या मुशीतून राजकारण आणि समाजकारण शिकले तो बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला शिवसेना या पक्षातून.
या पक्षात आत्तासुद्धा काही प्रमाणात निर्णयाचं विकेंद्रीकरण आहे म्हणून पक्ष मोठ्या प्रमाणावर फुटून सुद्धा उद्धव ठाकरे हे काही आमदार आणि खासदार निवडून आणून जाग्यावरच आहेत. मनसे फुटला नाही परंतु कार्यकर्ते सोडून गेले किंवा राज ठाकरे यांनी आपल्या मनाप्रमाणे त्यांना काढून टाकले. सध्या मनसेकडे गमावण्यासारखं काहीच नाही कारण त्यांनी वीस वर्षात काहीच कमावलेले नाही. त्याला पुन्हा कारणीभूत ठाकरे यांचा स्वभावच. कोणताही पक्ष हा त्या पक्षप्रमुखांच्या ‘मूड ‘ प्रमाणे चालत नाही. पक्षाची ध्येय धोरण ही पक्षाच्या उच्चस्तरीय नेत्यांची आणि पक्षप्रमुखांच्या विचारसरणीवर आणि एकत्रित निर्णय प्रक्रियेवर चालावी लागतात तरच राजकीय पक्ष म्हणून त्याची वाटचाल व्यवस्थित होऊ शकते. असे झाले नाही तर तो पक्ष मरतो,संपतो किंवा क्षतिहीन होतो. राज ठाकरे पक्ष म्हणून जे चालवतात तो पक्ष नाही तर ती आता संघटना झाली आहे. कारण राज ठाकरेंचा हा कथित पक्ष त्यांच्या मूळ प्रमाणे स्वभावाप्रमाणे चालत आला आहे.त्यामुळे राज ठाकरे यांनी खूप चांगली माणसं आपल्यापासून दूर केली आहे आणि गमावलीपण आहेत. काही काळ पक्ष हा पुढे जातो असे वाटते पण तो बॅकफूटवरच आहे. वैभव खेडेकर यांच्यासारखा नेता त्यांनी बाहेर घालवला. सहानुभूती कोणाला मिळाली ? वैभव खेडेकर यांना निश्चितच मिळाली आहे. स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका अगदी टप्प्यावर आल्या आहेत अशा वेळेस एका महत्त्वाच्या नेत्याला त्यांनी बाहेर काढले आणि याचे प्रचंड नुकसान मनसेला सोसावेच लागणार आहे.हा आत्मघाती निर्णय आहे. राज ठाकरे यांनी त्यांना भेट दिली नाही. आपल्याच कार्यकर्त्याला आपल्याच पक्षाच्या नेत्याला भेटायचे नाही. परस्पर निर्णय घ्यायचे आणि व्यक्तिमत्त्वाचे उदातीकरण करायचं,अवतीभवती असलेल्यांनी कौतुक करायचं याही पुढे जाऊन काही ठरविक माध्यमकर्मी आणि याची बातमी करायची आणि ती चालवायची या सर्व वलयातच राज ठाकरे हे रमलेले दिसतात.कधीतरी एखादा विषय हाताळायचा म्हणून बाहेर पडायचं आणि पुन्हा एकदा शिवतीर्थाववरूनच ‘दरबारी ‘राजकारण चालवायचं हे आता,पुढच्या काळात चालू शकणार नाही. दरबारी राजकारणाचे दिवस संपले.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकमेव व्यक्तिमत्व महाराष्ट्रात होवून गेलं की ज्यांनी सिंहासनावर बसून समांतर सरकार चालवलं. पण हे सर्वांना जमेल असा अजिबात नाही. राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचे सर्व गुण घेतले आहेत.एक गुण मात्रा अजिबात घेतला नाही तो म्हणजे कार्यकर्त्याला सांभाळण्याचा.मी पक्षाचा प्रमुख आहे, मी संघटनेचा प्रमुख आहे म्हणून मी कोणतेही निर्णय घेऊ शकतो कसाही वागू शकतो किंवा कुठेही जाऊ शकतो या गोष्टी पक्षाच्या ध्येयधोरणाशी सुसंगत नाहीत पण न्याय्यही नाहीत. वैभव खेडेकर हे भाजपच्या नेत्यांशी जवळीक साधून आहेत, याचा राग ठाकरे यांना आला व त्यांनी भेट न देता त्यांना काढून टाकले परंतु हेच राज ठाकरे दिल्लीत अमित शहा यांना भेटायला गेले यावेळी अगोदर खुलेआम भाजपचे कौतुक करत होते. राज ठाकरे याआधी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले मुख्यमंत्री त्यांना भेटायला आले त्यावेळी गॅलरीतून फोटोसेशन ही झाले. ह्या सर्व गोष्टी चालतात.पण आपला कार्यकर्ता किंवा नेता इतर पक्षाशी बोललेला चालत नाही, त्याच्यावर विश्वास नाही ही ‘डबल फेस ‘ भूमिका आहे. एखादी गोष्ट किंवा एखादी भूमिका किंवा निर्णय ठरवला तर तो अंमलात आणण्याची पहिली नैतिक जबाबदारी त्या पक्षाच्या प्रमुखाची असते आणि नंतर ती झिरपत खाली कार्यकर्त्यांपर्यंत येते.राज ठाकरे यांना हे कोण सांगणार आणि सांगून ते कितीसे वळणार ? वैभव खेडेकर यांच्या पक्षीय कारवाईनंतर हा विषय अधिक अधोरेखित झाला आहे. वैभव खेडेकर यांना बाहेर काढण्यात आलं. कदाचित वैभव खेडेकर यांच्या गेल्या काही वर्षातील वागणुकीचा लेखाजोखा ठाकरे यांच्याकडे आला असावा.मात्र त्याबद्दल खुलासा मागवण्याचा किंवा विचारण्याचा हक्क आणि अधिकार ठाकरे यांना जरूर आहे मात्र त्यांनी तसे न करता किंवा तशी संधी न देता थेट कारवाई केली ही काही अनेकांना पटलेली दिसत नाही. अशा अशा कारवाया आणि अशा बडतर्फी किती करणार ? एक कार्यकर्ता तयार व्हायला अनेक वर्ष जातात.असा कार्यकर्ता आपल्या पक्षाशी निष्ठेने प्रामाणिकपणे आणि आपल्या आयुष्यातील काही वर्ष खर्चून जेव्हा पक्षासाठी वाटेल ते करण्याची तयारी ठेवतो अशा कार्यकर्त्याला ‘बाहेर’ काढणे म्हणजे स्वतःच्याच पक्षाच्या मुख्य ढाचावरच स्वतःच हातोडा मारण्यासारखा आहे, यामुळे पक्ष निश्चितच कमकुवत झाला आहे.

सतीश कदम
संपादक । कोकण एक्सप्रेस

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.