RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

सर्वसामान्य जनतेशी नाळ कायम ठेवून भाजप बळकट करूया!

पक्षप्रवेश केलेल्या सहकाऱ्यांच्या स्नेहमेळाव्यात प्रशांत यादव यांचे आवाहन

संगमेश्वर, देवरुखसह चिपळूण तालुका व परिसरातील शेकडो समर्थकांची उपस्थिती

चिपळूण : आपल्या सगळ्यांची एकजूट कायम ठेवत असताना आपली नाळ ही सर्वसामान्य जनतेशी आहे, याची जाणीव ठेवून काम करूया. भाजपची विचारधारा घराघरात पोहचली पाहिजे. ती पोहचवत असताना खूप काम करावे लागणार आहे. काम करणाऱ्यांच्याच पाठीशी लोकं उभी राहतात. त्यामुळे भाजपला मोठे करण्याचे काम करूया. तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आज एकत्र येण्याचे नियोजन केले आहे. कोकणच्या विकासासाठी, तरुणांच्या रोजगारासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि भविष्यातील कोकणच्या वेगळ्या वाटचालीसाठी आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, हे ठामपणे लोकांना सांगा, असे आवाहनही यावेळी प्रसिद्ध उद्योजक आणि नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रशांत यादव यांनी आपल्या सहकाऱ्यांना केले.

त्यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रमुख सहकाऱ्यांचा स्नेहमेळावा रविवारी (ता. 24) सायंकाळी चिपळुणातील शिक्षक पतपेढीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री. यादव बोलत होते. टिका करणाऱ्यांचा विचार करू नका. टीका होत राहू द्या, त्याशिवाय आपल्याला लढण्याचे बळ मिळत नाही. आपण मैदानात लढणारी माणसे आहोत. मैदानात जेव्हा उतरण्याची वेळ येईल त्यावेळी आपण पक्षशिस्तीचे पालन करून आपली ताकद दाखवू, असेही यावेळी यावेळी श्री. यादव म्हणाले.
यावेळी बोलताना श्री. यादव म्हणाले, 19 ऑगस्ट रोजी पहाटे मुंबईला निघण्यासाठी आम्ही घरातून बाहेर पडलो त्यावेळी माझ्या घरासमोरच गुडघाभर पाणी होते. गाड्या कशातरी पाण्यातून बाहेर काढल्या. धो-धो पाऊस पडत होता. सकाळीच सगळीकडे अंधार दाटल्यासारखे झाले होते. वालोपेत झोलाई मंदिराजवळ पोहोचल्यावर पाहिले आणि आश्चर्य वाटले. एवढ्या मोठ्या संख्येने देवरुख-संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यातून आपले सहकारी पावसाची तमा न बाळगता मोठ्या संख्येने पोहचले होते. झोलाई मंदिरात दर्शन घेतल्यानंतर वाहनांच्या ताफ्यासह सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जात असताना आपल्या आधीच पुढे गेलेल्या काही सहकाऱ्यांशी सातत्याने बोलणे सुरू होते. पुढे माणगावच्या पुलावर पाणी भरतेय, असा निरोप मिळाला. त्यानुसार शक्य तितक्या लवकर पोहचण्याचा प्रयत्न आपण केला. तसे संदेश आपण प्रत्येक गाडीतील सहकाऱ्यांना देत होतो. पुढे जाऊन तरी पाऊस थांबेल, असे वाटत होते. पण मुंबईतही पावसाचा प्रचंड जोर होता. पण जेव्हा परिवर्तन घडते त्यावेळी निसर्ग आपली परीक्षा घेत असतो. आपण प्रवाह बदलायला निघालो होतोया प्रवाहाला आपण किती ताकदीने आपण बदलू शकतो, हे सगळेच जण पाहत होते…भारतीय जनता पक्ष पाहत होता…निसर्ग पाहत होता. पक्षाच्या वरीष्ठांना त्यांच्या यंत्रणेमार्फत सगळ्या गोष्टी पोहचत होत्या. आपण ज्यावेळी मुंबईत दाखल झालो, आपण अटल सेतूला लागलो, त्यावेळी आपल्यासाठी संपूर्ण रस्ता मोकळा करून देण्यात आला. टोलनाका आणि सिग्नल यंत्रणेत आपण अडकू नये, याची खबरदारी भाजपच्या वरिष्ठांनी घेतली होती. त्यामुळे आपण सगळे सुखरूप विनाअडथळा मुंबईत पोहचलो.
ते म्हणाले, भाजपमध्ये जात असताना अशी अनेक मंडळी आहेत ज्यांनी 25, 30, 40 50 वर्षे एकाच पक्षात काम केले आहे. पण आपण चांगल्या विचारांबरोबर, चांगल्या व्यक्तींबरोबर, चांगल्या लोकांबरोबर, चांगल्यासाठी गेले पाहिजे, असा विचार अनेकांनी केला. कदाचित त्यामुळे आपल्या भागाचा, आपल्या लोकांचा विकास होईल, आपल्या तरुणांचा, महिला भगिनींचा विकास होईल, असा विश्वास वाटल्यानेच या मंडळींनी भाजपचा झेंडा हाती घेतला. आज प्रत्येक जण माझ्यावर विश्वास ठेवून असेल, तसाच मलाही विचार करावा लागला की निवडणूक आपण हरलो, पण ठिक आहे, विचारांची लढाई लढलो, पण या सहकाऱ्यांना विकास आणि दिशा देण्याचे काम आपल्यालाच करायचे आहे. यासाठी आपल्याला कोणतातरी मार्ग निवडावा लागेल. या सगळ्यांचा गंभीरपूर्वक विचार करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा विचार केला. प्रवेशापूर्वी या पक्षाची 15 वर्षांची स्थित्यंतरे जवळून पाहिली, काम करण्याची पद्धत पाहिली, भाजपच्या अनेक नेत्यांना भेटलो, त्यांची आपल्याला सन्मान देण्याची भूमिका जाणून घेतली आणि त्यावेळी ठरवले की आज माझ्या कार्यकर्त्यांना भाजपमध्येच न्याय मिळू शकतो, म्हणून फक्त आणि फक्त माझ्या कोकणाचा विकास, माझ्या सहकाऱ्यांचा विकास, कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी, तरुणांना रोजगार देण्यासाठी आणि मागील विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने जेव्हा माझी खात्री पटली, तेव्हाच मी तुम्हा सर्वांना माझ्यासोबत भाजपमध्ये येण्याची हाक दिली. भाजपमध्ये जाताना त्या ताकदीचे सहकारी सुद्धा आपल्या सोबत असले पाहिजेत, असे मला वाटत होते.
भाजपची विचारधारा इतर सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. हा पक्ष कार्यकर्त्यांना, त्यांच्यातील गुणांना महत्त्व देणारा पक्ष आहे. त्यामुळे तुम्ही-आम्ही काम केले, तर शंभर टक्के संधी मिळणार. फक्त आपल्याला भाजपमधील शिस्त आत्मसात करावी लागेल. थोडा अवधी लागेल, पण तुमच्यासारखी ताकदीची माणसे सोबत असली, तर परिवर्तन घडवायला आपल्याला कठीण नाही. त्यामुळेच तुमच्यासारख्या मेहनती कार्यकर्त्यांना सोबत घेण्याचा मी निर्णय घेतला. आपण सगळ्यांनी जो परिवर्तनवादी विचार केला आहे, त्यावर टीका होतेय. पण निश्चितपणे सांगतो मी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊनच विधानसभेतले मैदान गाजवले आणि आज जो भविष्याचा विचार करून मी निर्णय घेतलाय तो सुद्धा कार्यकर्त्यांना सोबत घेऊनच केला. एकटा जाऊन गुपचूप कुठे पक्षप्रवेश केलेला नाही. भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यापूर्वी सगळ्यांशी टप्प्याटप्प्याने चर्चा केली. छुपा अजेंडा आणि कोणताही स्वार्थापोटी भाजपमध्ये गेलोलो नाही. माझ्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी मला ताकद द्या, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्या आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या भागातील विकासकामे अडणार नाहीत, यासाठी निधी द्या, अशी मागणी मी भाजपच्या वरिष्ठांकडे केली. याव्यतिरिक्त मी स्वतःसाठी पक्षाकडे काही मागितलेले नाही. मला खात्री आहे, की एवढी जीवाची रान करणारी मंडळी माझ्यासोबत आली, मी समजतो की हाच माझा विजय आहे आणि हीच माझ्या कामाची पोचपावती आहे. बाकी काय पाहिजे? एवढी मते मिळाली विधानसभेला. कदाचित मी एखादी गोष्ट माझ्यासाठी पदरात पाडून घेऊ शकली असती. पण जे नेते काही गेले त्यांच्या मागून किती लोक गेले हे सर्वांनी पाहिले. तशी परिस्थिती जर माझ्या पाठीमागे झाली असती, तर माझ्याही चेहऱ्यावरचा रंग फार काळ टिकला नसता. पण माझा रंग उडू नये, याची काळजी घेणारी तुम्ही सगळी मंडळी आज भाजपमध्ये माझ्यासमवेत आहात, या व्यतिरिक्त आणखी काय पाहिजे. आज माझी ताकद दिसली. तुम्ही सगळे माझी ताकद आहात. किती ताकदीची माणसे आज इथे उपस्थित आहेत. त्यामुळे भाजप योग्य तो निर्णय करेल आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांना आपल्या ताकदीप्रमाणे सन्मानपूर्वक भाजप आपल्याला पुढे नेईल. मला खात्री आहे, की भाजपमध्ये आपल्या सगळ्यांना न्याय मिळेल, असा विश्वासही श्री. यादव यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, मी निर्णय घेण्यामागचा आणखी एक उद्देश होता, की माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी माझ्या निवडणुकीत जीवाचे रान केले. पण माझ्या सहकाऱ्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मला त्यांना न्याय देता आला पाहिजे. पण ज्या पक्षात आपण होतो तिथे माझ्या कार्यकर्त्यांसाठी निर्णय करण्याचे मला स्वातंत्र्य मिळेल, याची शंका होती. त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मी भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा केली. माझ्यासोबत ताकदीची लोकं येणार आहेत, त्यामुळे प्रत्येकाला न्याय देण्याचा शब्द मला भाजपच्या वरिष्ठांनी दिला आहे. तुम्हाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आता माझी आहे. तुमचा माझ्यावर टाकलेला विश्वासाला तडा जाणार नाही. तुमचे राजकीय भविष्य कुठेही अडचणीत येणार नाही, याची खात्री बाळगा. तुमच्या पाठीशी कायम राहण्याची हमी मी देतो.
ते पुढे म्हणाले, देवरुख-संगमेश्वरची माझी मंडळी गेले चार-पाच महिने माझी वाटप पाहतायत. पण माझ्यासमोर प्रश्न होते, की मी कोणत्या भूमिकेतून त्यांच्यासमोर जाऊ? त्यांना योग्य दिशा, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विकासकामांबाबत त्यांना न्याय कसा देऊ? त्यामुळे मी त्या परिसरात जाण्याचे टाळत होतो. तेव्हाच्या परिस्थितीत आपण कार्यकर्त्यांना काही देऊ शकत नव्हतो. त्यामुळे कधीकधी राजकारणातून थांबायचा विचारही यायचा. पण अशा कठीण प्रसंगी आपण सगळ्यांनी ताकद दिलीत. मी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्कमंत्री नितेश राणे यांच्यासह भाजपच्या सर्व नेत्यांना धन्यवाद देईन. त्यांनी सन्मानाने मला भाजपमध्ये बोलावले. केवळ माझी भूमिका जाणून घेतली नाही, तर मला स्पष्टपणे माझे व्हिजन साकारण्याकरिता मला ताकद देण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. शब्द पाळणारी आणि ते खरे करणारी ही माणसे आहेत. म्हणून खात्री पटल्यानेच तुम्हाला सगळ्यांना मी माझ्याबरोबर येण्याची हाक दिली. तुम्ही जसा विधानसभा निवडणुकीत माझ्यावर विश्वास दाखवला होता, तसाच विश्वास तुम्ही आज माझ्यावर ठेवून माझ्या पाठीशी उभे राहिलात. हे ऋण मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही. हे ऋण मला आयुष्यात कधीही फेडता येणार नाहीत एवढे ओझे तुम्ही माझ्या खांद्यावर दिले आहे. पण मी माझ्या प्रामाणिक कार्यातून हे ऋण कमी करण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या समवेत उभे राहण्याचे आश्वासन देतो. यापुढच्या काळात नेता म्हणून किंवा नेतृत्व म्हणून माझा आदेश तुमच्यावर लादणार नाही. जे काही निर्णय घ्यायचे असतील, ते तुमच्या सगळ्यांशी विचारविनिमय करूनच घेतले जातील. हा माझ्या जवळचा किंवा तो लांबचा असा भेदभाव केला जाणार नाही, एवढा विश्वास देतो. पण नव्याने आपण भाजपमध्ये प्रवेश केले आहे. त्यामुळे त्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाही आपण सन्मान राखला पाहिचे, एवढी काळजी आपण घेऊया. इतर पक्षात ज्या पद्धतीने आपण आतापर्यंत ताकदीने काम केले, त्याच ताकदीने आपण भाजपमध्ये काम करूया आणि पक्षाला ताकद देऊया. आपण सगळे हाडाचे कार्यकर्ते आहोत आणि हाडाच्या कार्यकर्त्याला कोणत्याही शिफारसीची गरज लागत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. त्यांनीही आपल्या सर्वांचे कौतुक केले आहे. लवकरच कोकणचा दौरा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यावेळी आपल्यापैकी मागे राहिलेल्या अनेकांचा सन्मान केला जाईल, असेही यावेळी प्रशांत यादव यांनी सांगितले.

      या स्नेहमेळाव्याला देवरुख-संगमेश्वरसह चिपळूण शहर, तालुका आणि परिसरातील भाजप प्रवेशकर्ते, प्रमुख सहकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण-तरुणी, प्रशांत यादव यांचे विविध क्षेत्रातील हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे स्नेहमेळाव्याला सभेचे स्वरुप आले होते. उपस्थितांमधूनही अनेकांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि प्रशांत यादव यांच्याशी पाठीशी ठामपणे कायम उभे राहणार असल्याचे सांगितले. 

………………..
चौकट

सौ. स्वप्ना यादव आणि त्यांच्या टीमचे कौतुक

यावेळी प्रशांत यादव यांनी पत्नी सौ. स्वप्ना यादव आणि त्यांच्या टीमचेही कौतुक केले. ते म्हणाले, आज हे सगळे उभे करताना सौ. स्वप्ना यादव आणि त्यांच्या टीमचीही प्रचंड मेहनत आहे. धो-धो पडणाऱ्या पावसात चिपळूणपासून मुंबईपर्यंत आणि पक्षप्रवेश सोहळा आटोपून मुंबईतून चिपळूणला पोहचेपर्यंत सर्वांना प्रवास कसा सुखरूप आणि सुखकर होईल, याची काळजी घेण्यासाठी ती टीम योग्य नियोजनासाठी राबत होती. त्यामुळे या टीमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत. त्यांच्यामुळे मला एवढी मोठी झेप घेता आली, हे नाकारून चालणार नाही. कारण एवढी मोठी ताकद जी माझ्या पाठीशी उभी राहिली, हे सगळे मी एकट्याने करतोय, असे दाखवणे मला मान्य नाही, अशा भावना प्रशांत यादव यांनी व्यक्त केल्या.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.