RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

ब्रेकिंग न्युज

कोकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था कोंकण प्रांत आयोजित रानभाजी- स्थानिक भाजी उत्सव: थाळी आणि अल्पोपहार कार्यक्रम उत्साहात

चिपळूण – कोकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था कोंकण प्रांत आयोजित रानभाजी- स्थानिक भाजी उत्सव: थाळी आणि अल्पोपहार असा कार्यक्रम उत्साह पार पडला. संस्थेच्या कार्यालयात ओकस् अकॅडमी, चिपळूण येथे मान. नगराध्यक्ष श्री. उमेश सकपाळ , या प्रभागाचे नगरसेवक शशिकांत मोदी व नगरसेविका अंजली कदम यांचेसह मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.

सुरवातीला संस्थेच्या अध्यक्ष डॉ. मीनल ओक यांनी संस्थेबद्दल व उपक्रमांबाबत माहिती दिली. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये कृषी पर्यटन क्षेत्रात काम करणारी कोकणातली ही पहिलीच संस्था आहे. या संस्थेमार्फत कृषी आणि पर्यटनाशी संबंधित उपक्रम केले जातात. तसेच कोकणामध्ये उत्पादित होणारी पिकं, फळं यांच्या प्रक्रियेबाबत स्पर्धा आयोजित केल्या जातात. जेणेकरून युवकांचे कोकणातून स्थलांतर थांबून कोकणातील तरुणांना नवे उद्योग संधी मिळतील. गेल्या काही वर्षात स्पर्धेमध्ये नंबर आलेल्या स्पर्धकांनी आदरातिथ्य क्षेत्रांमध्ये आपले उद्योग सुरू केले याबाबत मॅडमनी यशोगाथा सांगितल्या. मान्यवरांचे स्वागत श्री. रामशेठ रेडीज यांनी ‘चिपळूण संगमेश्वर पर्यटन’ पुस्तक देऊन केले. उद्घाटन प्रसंगी बोलताना नगरसेवक श्री. शशिकांत मोदी यांनी, “पुढील वर्षी महिला बालकल्याण विभागातर्फे नगर परिषद आणि कोंकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था असा रानभाज्या-स्थानिक भाज्या भोजनाचा कार्यक्रम समस्त चिपळूणकरांसाठी करूया असे नगराध्यच्या संमतीने जाहीर केले. सिंधूरत्न योजनेतून चिपळूण पर्यटनासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रोजेक्ट करूया असेही नमूद केले.”चिपळूण मध्ये अळूवडी व कोकणातील फळांवर प्रक्रिया करून त्या वस्तू महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध करून देणारे कोंकण प्रॉडक्ट प्रक्रिया उद्योजक श्री. अभय अंतरकर यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी ते करत असलेल्या उद्योगाची माहिती उपस्थितांना दिली. अळूवडी तयार करण्यासाठी अळूची पाने मात्र पालघर मधून ट्रेनने आणावी लागतात. येथे पुरेशी लागवड होत नाही, पाने उपलब्ध होत नाहीत ही खंत व्यक्त केली आणि तरुणांना या क्षेत्रात येण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

चिपळूण तालुका कृषी विभागाचे अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे साहेब यांनी प्रधानमंत्री व इतर योजनांबद्दल, महिलांसाठी ७५% सबसिडी उपलब्ध असल्याबद्दल माहिती दिली. फणस, शेवगा, अळू व कोकणात उपलब्ध असलेल्या कृषी उत्पादनापासून प्रक्रिया उद्योग सुरू होणे आवश्यक आहे यासाठी कृषी विभाग मार्गदर्शन करण्यास सदैव तयार आहेत असे आवाहन केले. नगरसेविका अंजली कदम यांनी रानभाज्या उत्सवा साठी शुभेच्छा दिल्या. माननीय नगराध्यक्ष उमेशजी सकपाळ यांच्या हस्ते भाज्या लागवड आणि रानभाज्या विक्री करणाऱ्या काही महिलांना प्रतिनिधिक स्वरूपात सन्मानित करण्यात आले. यामध्ये कळवंडे येथील सौ. नंदा बुरटे, आंबडस येथील सौ. रिया शिंदे, पाचाड येथील सौ. मनीषा कांबळी, सौ. गायत्री हुमणे यांना सन्मानित करण्यात आले. रानभाज्या- स्थानिक भाज्या तयार अन्न आहार अशा प्रकारचा कार्यक्रम चिपळूणमध्ये आयोजित केल्या बद्दल नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी आयोजकांचे कौतुक केले. असा मोठा कार्यक्रम पुढल्या वर्षी एकत्रित घेऊ असे आवाहन केले. कृषी अधिकारी श्री म्हेत्रे साहेब यांना, आपण लवकरच चिपळूण मधील शेतकऱ्यांना, महिलांना, तरुणांना एकत्र आणून, योजनांची आणि संधीची माहिती देण्यासाठी एक मार्गदर्शन सत्र आयोजित करूया अशी विनंती केली.या कार्यक्रमासाठी संस्थेचे मार्गदर्शक श्री रामशेठ रेडीज, विश्वास पाटील, संस्थेचे सदस्य संजय नाईक, पर्यटन तज्ञ समीर कोवळे, कैसर देसाई, ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम, उद्योजक उदय लोध, नंदू साडविलकर, श्री. वैभव संसारे, श्री.राजेश पाथरे, माजी नगरसेविका आदिती देशपांडे, सौ राधिका पाथरे, सी. ए. विवेक रेळेकर, उदयशेठ गांधी, सौ. कल्पना प्रभुदेसाई, सौ. विभा जाधव, सौ. स्वाती देवळेकर, प्रा. मयुरी काटकर, विशाखा चितळे तसेच सागरच्या संपादिका शुभदा जोशी उपस्थित होत्या. रानभाज्या स्थानिक भाजी थाळी उत्सवामध्ये माईन मुळा लोणचे, ओली हळद लोणचे, रान आवळा मध लोणचे, कासाळू चिवडा, कर्टुली-कारले मिक्स चिप्स, चिबुड रायतं, अळकुड्या सुकी भाजी, कंद रस्सा, भारंगी भाजी, कर्टुली भाजी, पातळ अळू भाजी, कवळा-कुरडू-भोपळा पाने यांच्या वड्या, भाकरी, मिक्स रानभाजी राईस, मोदक, टाकळा समोसा, अशा तयार रानभाज्या पदार्थांचा आस्वाद लोकांनी घेतला. संस्थेचे सचिव अमोल लोध यांनी कार्यक्रमाचा समारोप करून सर्वांचे आभार मानले

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.