चिपळूण आगार व्यवस्थापन हतबल : प्रवासी संतप्त आणि त्रस्त
चिपळूण – दररोज सकाळी आठ वाजता सुटणाऱ्या चिपळूण मुंबई या शिवशाही बसचे शुक्लकाष्ट काही संपताना दिसत नाही. या आरामदायी लक्झरी बससाठी अनेकजण आरक्षण करून ठेवलेले असतात. परंतु अनेकवेळा चालक नसल्यामुळे गाडी अर्धा ते एक तासावर लेट करून सोडली जाते. सोमवारी सुद्धा जवळपास एक तास विलंबाने ही गाडी सुटली परंतु चालकच नसल्यामुळे डेपो मॅनेजर साळवी यांना चालकांना अक्षरशः हात जोडून विनवणी करून गाडी चालवण्यासाठी घरातून आणावे लागले. मात्र हे प्रकार वारंवार घडत असल्याने दररोज जाणारे प्रवासी अत्यंत संतप्त आणि त्रस्त झाले आहेत याबाबत आता परिवहनमंत्र्यांनी दखल घेऊन शिस्त लावावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.
चिपळूण आगारातून अनेक गाड्या उशिराने धावत असतात परंतु चिपळूण मुंबई शिवशाही या वातांकुलीत आरामदायी लक्झरी बसला प्रवाशांची विशेष पसंती असली तरी ही गाडी खूप विलंबाने धावत असल्याने प्रवासी त्रस्त आहेत. सोमवारी तब्बल एक तास ही गाडी विलंबाने मार्गस्थ झाली. मात्र यासाठी आगार व्यवस्थापक श्री. साळवी यांना संबंधित युनियनशी बोलावे लागले आणि चालकाला हातापाया पडावे लागले अशी परिस्थिती आल्याचे दिसून आली. ही गाडी दररोज काही ना काही कारणाने लेट धावत असल्यामुळे प्रवासी ही त्रस्त आहे कारण या गाडीसाठी अनेकजण नेहमी प्रवास करत असतात. परंतु अनेक वेळा या गाडीला ड्रायव्हरच नसतो तर बराच वेळा गाडी रद्द करून प्रवाशांना दुसऱ्या गाडीतून बसून मार्गस्थ केले जाते असेही प्रकार घडत असताना दिसत आहेत. एकीकडे तोट्यात चालणारी एसटी महामंडळ दुसरीकडे प्रवासी अर्थात ग्राहकवर्गाबाबत प्रचंड अनास्था आणि बेजबाबदारापणा दाखवला जात असल्याचे चित्र चिपळूण बसस्थानकात तरी दिसून येत आहे. या बस स्थानकाचे काम अत्यंत रेंगाळत पद्धतीने सुरू आहे त्यामुळे प्रवाशांना सुद्धा बसण्याची व्यवस्थाही अजिबात नाही बराच वेळा तासनतास गाड्यांची वाट पहावी लागते अशी परिस्थिती आहे त्यातच अशा लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत असल्याने सर्वच गोष्टी प्रवाशांच्या मुळावर येत आहेत. अनेक वेळा येथील अधिकारीवर्ग सुद्धा हतबल झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घ्यावी अशी ही मागणी प्रवासी वर्गात न होत आहे. केवळ मुंबईपूता निर्णय घेणाऱ्या परिवहन मंत्री सरनाईक यांनी चिपळूणसारख्या महत्त्वाच्या शहराच्या परिस्थितीबाबतही आढावा घ्यावा आणि निर्देश द्यावेत असेही मागणी आता प्रवासी वर्गातून होत आहे. चिपळूण मुंबई शिवशाही गाडीचे वेळापत्रक सुधारले गेले नाही तर आता प्रवासीच बस स्थानकावरच ठिय्या आंदोलन करण्याच्या मनस्थितीत असल्याचे प्रवाशांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले