/ Sep 03, 2026

RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

ब्रेकिंग न्युज

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणचा भव्य मंगळागौर सोहळा दणक्यात संपन्न; वर्षाताई ढेकणे यांच्या नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक

रत्नागिरी – भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य मंगळागौर स्पर्धा व सांस्कृतिक सोहळा अभूतपूर्व उत्साहात आणि मोठ्या दणक्यात संपन्न झाला. रत्नागिरी जिल्ह्यात महिलांसाठी एवढ्या भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मा. देवेंद्रजी फडणवीस, माननीय खासदार नारायणराव राणे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री मा. आशिषजी शेलार, रत्नागिरीचे संपर्क मंत्री मा. नितेशजी राणे, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा मा. चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मा. प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता.

महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन करत महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला माता-भगिनींचा प्रचंड प्रतिसाद लाभला. पारंपरिक मंगळागौरीचे खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि मनोरंजनाने भरलेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण झाले होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार. कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व सेलिब्रिटींनी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सौ. वर्षाताई परशुराम ढेकणे, महिला मोर्चा कार्यकारिणी तसेच शहर व तालुक्यातील मंडल अध्यक्ष, सरचिटणीस आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट नियोजनाचे, मेहनतीचे व कार्यक्षम नेतृत्वाचे तोंडभरून कौतुक केले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिलांना एकत्रित करून सांस्कृतिक परंपरेचा उत्सव साजरा करण्याची कल्पना आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी अत्यंत कौतुकास्पद असल्याचे कलाकारांनी सांगितले.

यावेळी उपस्थित कलाकारांनी वर्षाताई ढेकणे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची प्रशंसा करत त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. महिलांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे वर्षाताईंचे कार्य निश्चितच प्रेरणादायी असल्याच्या भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या.

कार्यक्रमाच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे उपस्थित महिला, नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर भारावून गेले होते. कार्यक्रमातील शिस्तबद्ध नियोजन, प्रत्येक घटकाची बारकाईने केलेली व्यवस्था आणि हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा सोहळा रत्नागिरीच्या सांस्कृतिक इतिहासात विशेष ठरला.

उपस्थित माता-भगिनींनीही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचे विशेष कौतुक करत, “तालुक्यात महिलांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर, एवढ्या नियोजनबद्ध आणि भव्य स्वरूपात असा कार्यक्रम यापूर्वी कधीच झाला नव्हता,” अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पत्रकार व प्रसारमाध्यम प्रतिनिधींनीही या उपक्रमाच्या भव्यतेचे आणि उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले.

विशेष म्हणजे, हा कार्यक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन, पारंपरिक खेळांचे संवर्धन आणि महिला शक्तीच्या एकतेचे प्रभावी दर्शन घडविणारा ठरला. त्याचबरोबर कार्यक्रमादरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या तसेच भारतीय जनता पार्टी सरकारच्या महिलांसाठी असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती उपस्थित माता-भगिनींना देण्यात आली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिला आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या अधिक सक्षम व स्वावलंबी व्हाव्यात, यासाठी मार्गदर्शनही करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सौ. वर्षाताई परशुराम ढेकणे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व महिला पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, मंडल अध्यक्ष, सरचिटणीस, कार्यकारिणी सदस्य, विविध आघाड्यांचे पदाधिकारी तसेच कार्यक्रमात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व माता-भगिनींचे मनापासून कौतुक करत विशेष आभार मानले.

“हा कार्यक्रम केवळ माझ्या किंवा एका व्यक्तीच्या प्रयत्नातून यशस्वी झालेला नसून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने, महिला मोर्चाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि माता-भगिनींनी दिलेल्या सहकार्यामुळे हा भव्य सोहळा यशस्वी झाला आहे,” अशा भावना वर्षाताईंनी व्यक्त केल्या.

यापुढील काळातही सर्वांनी एकजुटीने आणि संघटितपणे काम करून भारतीय जनता पार्टीची विचारधारा घराघरात पोहोचवण्याचा तसेच रत्नागिरी जिल्ह्यात महिला मोर्चाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करून महिला मोर्चाचा विस्तार करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि उत्कृष्ट पद्धतीने पार पडल्याने उपस्थित महिला, नागरिक, पत्रकार आणि मान्यवरांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले. या भव्य आणि ऐतिहासिक मंगळागौर सोहळ्याच्या यशस्वी आयोजनामुळे सौ. वर्षाताई परशुराम ढेकणे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने रत्नागिरी जिल्ह्यात एक नवा आदर्श निर्माण केला असून, या कार्यक्रमाची चर्चा आता संपूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यात रंगली आहे.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.