एडवोकेट असीम सरोदे यांची मिळणार कायदेशीर साथ
लोटे (तालुका खेड ) – कोकण नागरी संघर्ष समिती व लोटे पंचक्रोशी पर्यावरण समितीच्या सदस्यांनी लक्ष्मी कंपनीकडून PFAS (Per- and Polyfluoroalkyl Substances) संबंधित होणाऱ्या संभाव्य पर्यावरणीय प्रदूषणाच्या प्रश्नावर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांची भेट घेतली.एडवोकेट असीम सरोदे यांच्याकडून हरित लवादाकडे या संदर्भात खटला दाखल करण्याबाबत मार्गदर्शन घेण्यात आले असीम सरोदे यांनी यावेळी आपण तुम्हाला कायदेशीर मार्गदर्शन यापुढे देऊ आश्वासन दिले आहे.
लक्ष्मी कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेत PFAS सारख्या फॉरेव्हर केमिकल्सचा वापर किंवा त्यातून होणारे उत्सर्जन/अपशिष्ट यामुळे परिसरातील पाणी, माती, शेती, जैवविविधता आणि मानवी आरोग्यावर होणारे संभाव्य परिणाम याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. PFAS रसायनांच्या दीर्घकाळ टिकून राहण्याच्या गुणधर्मामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे समितीने मांडले.या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित लवादात (NGT) योग्य कायदेशीर पुरावे, पर्यावरणीय अहवाल, प्रदूषणासंबंधी कागदपत्रे आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे केस दाखल करण्याच्या प्रक्रियेबाबत असीम सरोदे यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यात आले.लोटे पंचक्रोशीतील नागरिकांचे पाणी, पर्यावरण, शेती आणि भविष्यातील पिढ्यांचे संरक्षण हा या लढ्याचा केंद्रबिंदू आहे. PFAS प्रदूषणाचा प्रश्न कायदेशीर आणि शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे राष्ट्रीय पातळीवर मांडण्याच्या दिशेने ही भेट महत्त्वाचे पाऊल ठरली आहे.