RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

ब्रेकिंग न्युज

पेढांबे ब्रिजवर वाहतूक कोंडीचा विळखा; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ त्रस्त

चिपळूण : पेढांबे ब्रिजवर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, पुलावरील खड्डे आणि वाढलेली अवजड वाहनांची वर्दळ यामुळे स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडीची समस्या वारंवार निदर्शनास येत असतानाही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
पेढांबे ब्रिज हा एकेरी वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग असताना या ठिकाणी मोठ्या वाहनांची गर्दी वाढल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यातच पुलावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. ऐन गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीची ही समस्या अधिक गंभीर बनली असून, नागरिकांना वेळेवर प्रवास करणेही कठीण होत आहे.
दरम्यान, पिंपळी येथील ब्रिज कोसळल्यामुळे खडपोली औद्योगिक वसाहतीकडे जाणारी जड वाहतूक रात्री ११ नंतर सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र प्रत्यक्षात दिवसभर मोठ्या प्रमाणात अवजड वाहने या मार्गावरून जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पेढांबे ब्रिज परिसरात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून, याचा थेट फटका स्थानिक ग्रामस्थांना बसत आहे.
शासनाने वाहतुकीबाबत दिलेले नियम आणि निर्देश अक्षरशः धाब्यावर बसवले जात आहेत का? असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. या समस्येबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
वाहतूक कोंडी, पुलावरील खड्डे आणि दिवसा सुरू असलेली अवजड वाहतूक यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन अवजड वाहतुकीचे नियमन करावे, पुलावरील खड्डे बुजवावेत आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अन्यथा प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही, तर खडपोलीकडे जाणारा रस्ताच बंद करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे आता प्रशासन या गंभीर प्रश्नावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.