चिपळूण (प्रतिनिधी):– निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरदारपणे सुरुवात झाली असून आता प्रचार फेरी, रॅली, सभा सुरू झाल्या असून चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे प्रशांत यादव निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यादव यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शुक्रवार दिनांक ८ रोजी चिपळूण दौऱ्यावर येत असून सकाळी १० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील मैदानात महाविकास आघाडीची प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारार्थ सभा
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आली. यामध्ये महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे. प्रशांत यादव यांनी उमेदवारी अर्ज भरल्यापासून महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकाऱ्यांसमवेत प्रचार फेरी व छोट्या-छोट्या सभांमधून जोरदार मुसंडी मारली आहे.
तर आता प्रचारात आणखी जोर वाढावा यासाठी येत्या काही दिवसांत नेत्यांच्या सभा होणार असल्याची चिन्हे आहेत. यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शुक्रवारी चिपळूण दौऱ्यावर येत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारार्थ इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील मैदानात सकाळी १० वाजता महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे निरीक्षक बबन कनावजे, प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार रमेश कदम, माजी पालकमंत्री रविंद्र माने, माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, शिवसेना उबाठा रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, उत्तर रत्नागिरी सहसंपर्कप्रमुख सचिन कदम, उपजिल्हाप्रमुख प्रताप शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाच्या नेत्या नलिनी भुवड, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्याशेठ बने, काँग्रेसचे नेते सहदेव बेटकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. दीपिका कोतवडेकर, काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. विभावरी जाधव, शिवसेना उबाठा महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. अरुणा आंब्रे, महिला जिल्हा संघटक वेदा फडके यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. तर या सभेमुळे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.
या सभेला महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मतदारबंधू-भगिनींनी उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख विनोद झगडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष लियाकत शाह, शिवसेना उबाठा संगमेश्वर तालुकाप्रमुख बंड्या बोरूरकर, काँग्रेसचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष दत्ता परकर आदींनी केले आहे.