चिपळूण – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या ‘विशेष मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण’ (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रम सुरू आहे. या मोहिमेत चिपळूण उपविभागाने एक नवा विक्रम प्रस्थापित केला असून, मतदार यादीचे शंभर टक्के डिजिटलायझेशन पूर्ण करणारे चिपळूण तालुक्यातील’टेरव बुद्रुक’ हे महाराष्ट्रातील पहिले गाव (मतदार यादी भाग) ठरले आहे.
केवळ ७ दिवसांत काम फत्ते!
या विशेष मोहिमेची सविस्तर माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. “३० जून ते २९ जुलै या कालावधीत ‘बीएलओ’ (BLO) घरोघरी जाऊन गणना अर्ज (E-Form) भरून घेणार आहेत आणि त्यानंतर त्याचे डिजिटलायझेशन केले जाणार आहे. या प्रक्रियेत बीएलओ यांना येणाऱ्या तांत्रिक आणि इतर अडचणी समजून घेण्यासाठी आम्ही सुरुवातीला एकाच मतदार यादी भागाची (गांव) संपूर्ण प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करण्याचे ठरवले.”
यासाठी चिपळूण विधानसभा मतदार संघातील (२६५) टेरव बु॥ या गावाची निवड करण्यात आली होती. केवळ ७ दिवसांच्या विक्रमी वेळेत या गावातील संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे.
असे झाले कामाचे नियोजन:
टेरव बुद्रुक गावातील एकूण १९५ मतदारांपैकी १८७ मतदारांच्या अर्जांचे यशस्वी डिजिटलायझेशन करण्यात आले.
स्थलांतरित मतदार: उर्वरित ८ मतदारांपैकी ५ मतदार हे नोकरी/व्यवसायानिमित्त इतरत्र स्थलांतरित झाले आहेत, तर ३ मतदार हे कायमस्वरूपी इतर ठिकाणी वास्तव्यास गेले आहेत.
महत्त्वाची भूमिका: हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी स्थानिक तलाठी, अंगणवाडी सेविका आणि निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी (क्लर्क) समन्वयाने काम केले. घरोघरी जाऊन डेटा गोळा करणे आणि त्याचे तात्काळ ऑनलाइन डिजिटलायझेशन करणे ही दोन्ही कामे अचूकपणे पार पाडण्यात आली.या यशामुळे चिपळूण उपविभागाचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत असून, इतर गावांसाठी देखील हे नियोजन मार्गदर्शक ठरणार आहे.