संपादकीय
छत्रपती संभाजी राजांच्या जीवन कार्यावर आधारित ‘छावा ‘ चित्रपट सध्या देशातील अनेक चित्रप गृहात प्रचंड प्रतिसादात सुरू आहे. केवळ महाराष्ट्रातच बोलायचं झालं तर, या चित्रपटाच्या गर्दीने थिएटर ओसंडून वाहून गेली आहेत. सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी या महापराक्रमी अतुल शौर्य गाजवणाऱ्या राजाला औरंगजेबाने कपटाने पकडून जे हाल केले ते पाहताना साडेतीनशे वर्षानंतर ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता खुर्चीत बसून ढसाढसा रडत आहे, अनेकांना हे पडद्यावरचे हाल पाहवत नाही. महाराष्ट्रातील सामान्य लोक हे इतके भावनिक आहेत, हळव्या मनाचे आहेत आणि तेवढेच ते संवेदनशील सुद्धा आहेत. साडेतीनशे वर्षांपूर्वीची ही जखम भळभळली, तिच्यावर खरंतर खपली आलीच नव्हती त्या जखमेने सारा महाराष्ट्र पुन्हा हळहळला.
इथे नमूद करायचा मुद्दा हाच आहे की, महाराष्ट्राच्या संवेदनशीलतेला कोणत्याही मर्यादा नाहीत. हाच महाराष्ट्र आजच्या काळातील एका घटनेने हादरला आहे, मानसिक धक्क्यामध्ये गेला आहे, खरंतर महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेचा प्रचंड मानसिक गोंधळ झाला आहे, नेमकं चाललय काय महाराष्ट्रात हेच कळत नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास तीन महिने होत आले आणि पोलिसांनी अकराशे पानाच्यावर चार्जशीट दाखल केले. हे आरोपपत्र दाखल करताना तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये पुराव्यासाठी जे फोटो आणि व्हिडिओ दाखल केले आहेत, ते आता सोशल मीडियावर आणि वृत्तपत्रांमधून प्रसारित झाले आहेत. ते पाहून अक्षरशः महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मानसिकदृष्ट्या हादरला,सुन्न झाला. एखाद्या व्यक्तीची एवढ्या क्रूरपणे, विकृतपणे आणि सर्व मर्यादा पार करून त्या करण्यात येते, तेही सुसंस्कृत आणि संवेदनशील महाराष्ट्रात ? हीच गोष्ट सर्वांनाच शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या प्रकारच्या विकृत लोक या महाराष्ट्रात आहेत. ही खरंतर माणसं म्हणायच्या लायकीची नाहीत, हैवानांच्याही पातळीच्यावर त्यांनी हे कृत्य केलेले आहे. संतोष देशमुख यांची ज्या निर्दयतेने हत्या करण्यात आली ते फोटो पाहून अनेकांना रडू कोसळलेले. एका न्यूज चॅनलचा महिला पत्रकार ही ऑन कॅमेरा ढसाढसा रडली ती आपल्या भावनांना आवरु शकली नाही. त्यातलं कौर्य हे फोटोतून जर एवढं अंगावर शहारे आणणारा असेल तर प्रत्यक्षात संतोष देशमुख आणि काय हाल भोगले असतील याची कल्पनाच केलेली बरी. प्रचंड यातना आणि विकृतीच्या सर्व मर्यादा पार करून देशमुख यांच्या हत्या करण्यात आली. त्या करताना मारेकरी हसत होते, देशमुखांचा छळ करतानांचा आनंद घेत होते, फोटो काढत होते, व्हिडिओ काढत होते. हैवान खरंच या मातीतले आहेत का ? संतोष देशमुख यांना रॉडनी प्रचंड मारहाण करण्यात आली. एवढी मारहाण करण्यात आली की, शरीरातला सर्व रक्त साकळून पायात जमा झालं. काही लिटर रक्त एकाच ठिकाणी जमा झाले. पाणी मागितलं म्हणून त्त्यांच्या तोंडावर मूत्र विसर्जित करण्यात आले. काही तास ही मारहाण चालू होती. या हैवानांना फाशी शिवाय सजा आहे का ? साऱ्या महाराष्ट्रात हाच आक्रोश आहे. या हैवानांचा सूत्रधार जेलमध्ये आहे. परंतु तो व्हीआयपी ट्रीटमेंटमध्ये आहे दोन दोन तास फोनवर बोलतो, बेडवर झोपतो, पाहिजे ते मागवतो सर्व काही आलबेल चालू आहे. राजकारण किती मातीत गेले आहे याचे हे उदाहरण आहे. गेल्याच आठवड्यात, स्वारगेट बस स्थानकामध्ये एका मुलीवर अत्याचार झाला आणि त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला गजाआड केले. परंतु अत्याचार झाला त्याहीपेक्षा त्या मुलीवर मानसिक सामाजिक अत्याचार अनेक घटकांकडून झाला. एक ठोंबरे नावाची राजकीय पक्षाची अति शहाणी महिला आहे. तिने सरळ सरळ या मुलीचे बदनामी केली. बेअब्रू केली आणि तिचे आणि आरोपीचे पैशावरून वाद झाल्यामुळे तिने हे आरोप केल्याचे जाहीर केले. ही कुठची मानसिकता आहे ? ही सुद्धा एक मनोविकृती आहे. कोणताही पुरावा नसताना किंबहुना काहीही माहिती नसताना सदर महिलेने एका महिलेची अब्रू काढली आणि तिला मानसिक त्रास दिला हेही या महाराष्ट्रात घडते आहे. गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत हिंसात्मक घटना महाराष्ट्रात घडत आहेत. महिलांना तर सुरक्षेतेची कसलीही हमी नाही किंवा त्या मोकळ्या मुक्त वातावरण फिरू शकत नाहीत ही परिस्थिती आहे. बीड जिल्हा हा गुन्हेगारीचा बिहार आहे हे आम्ही मागेच म्हटले होते. तब्बल वीस ते पंचवीस वर्षानंतर बीड जिल्ह्यातल्या ह्या गुन्हेगारीचा खड्डा खणला जातो आहे. परंतु गेल्या वीस-पंचवीस वर्षात या ठिकाणी किती हत्या झाल्या याची मौजदाद नाही. संतोष देशमुख याला खंडणी घेण्यास विरोध केला म्हणून मारण्यात आलं. मारणारे हे कोणत्या नेत्यांशी निगडित होते हे नवीन सांगायला नको . या सर्व टोळक्याचा सूत्रधार वाल्मीक कराड हा याच खंडणीच्या आणि दहशतीच्या जोरावर हजारो कोटीची संपत्ती गोळा करून आहे. त्याचं कोण वाकड करू शकत नाही. पोलीस अधिकारी किंवा महसूल अधिकारी या जिल्ह्यामध्ये बदली करून घेण्यास कचरत असतात, एवढी दहशत या जिल्ह्यामध्ये आहे. संतोष देशमुख प्रकरणाने बीड जिल्ह्याचा खरा विकृत चेहरा समोर आला. अर्थात सर्वसामान्य बीड जिल्ह्यातील लोकांनाही याचा दोष देता येणार नाही परंतु त्यांनीही सहन केले ही त्यांची चूक आहे. आता याप्रकरणी ‘नैतिकते ‘च्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला. पण खरंच या महाराष्ट्रात नैतिकता शिल्लक राहिली आहे का ? हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. नैतिकता असती तर धनंजय मुंडे यांनी केव्हाच राजीनामा दिला असता. राजीनामा नाईलाजाने द्यावा लागला. महाराष्ट्राच्या राजकारणाचा अक्षरशः चोथा झाला आहे. कोरटकर, सोलापूरकर सारखी राजकीय पक्षाशी निगडित असलेली मानसिक विकृतीची लोक हे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांवर वाट्टेल ते खुलेआम बोलतात. त्यांना कसलाच धाक जरब नाही. त्यांना राजकर्त्यांकडूनच अभय मिळते. एवढं बोलण्याचं ‘धाडस’ हे लोक हे लोक कसे काय करू शकतात ? महाराष्ट्रातलं सुसंस्कृत, नैतिक राजकारण केव्हाच संपला आहे. आत्ताचं राजकारण हे विश्वासघातकी, डावपेचाच आणि एकमेकांना संपवण्याचा आहे. आत्ताचं राजकारण म्हणजे हा एक मोठा गेम आहे. या डावपेचात सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. कायदा आणि सुव्यवस्था नावालाही शिल्लक नाही. सामान्य माणूस रामभरोसे जगतो आहे. वाल्मीक कराड आणि त्याच्यासारख्या विकृत साथीदारांची कमी जास्त प्रमाणात महाराष्ट्रात पैदास आहे, त्यापुढे प्रशासन आणि कायदेशीर यंत्रणांही हतबल आहेत. एक संतोष देशमुख यांची हत्या पुढे आली, बाकीच्यांचं काय हा प्रश्न अजूनही शिल्लक आहे आणि तो तसाच राहणार आहे.
सतीश कदम
संपादक कोकण एक्सप्रेस
8855044225