RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

‘बीड मर्डर पॅटर्न फाईल’

संपादकीय ॥ कोकण एक्सप्रेस

कोणाचीही हत्या करण्यापूर्वी हत्या होणाऱ्या व्यक्तीच्या घरासमोर नैवेद्य दाखवून ‘राम नाम सत्य है ‘ म्हणणार, व्हिडिओ करून नंतर त्याची हत्या,पिस्तूल कोयते दाखवून दहशत, ज्याची मर्डर होणार त्याची खबर सर्वांना अगोदरच देवून खुलेआम, सत्तूर, कोयते याचा सर्रास वापर,संपूर्ण बीड जिल्ह्यात बंदूक आणि पिस्तूलची हजारोंच्या संख्येत विक्री, कायदा व पोलीस याचा नामोनिशान नाही. गेल्या काही वर्षात तब्बल तेरा हत्या झाल्या पण परंतु तपास नाही. हत्या करणारा वेगळा, सापडलेला किंवा स्वतःहून कबुली देणारा वेगळा आणि तुरुंगात जाणारा वेगळा असा पॅटर्न बीड जिल्ह्यात आहे.त्यामुळे मूळ सूत्रधार आणि हत्यारा हे मोकाटच फिरतात. पुन्हा नवीन हत्या, पुन्हा दहशत खंडणी वसुली आणि सर्वजण वेठीला व दहशतीच्या छायेखाली. हा महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातील बीड फाईल मधला मर्डर पॅटर्न आहे. जो सर्वांना माहिती आहे, परंतु बोलायला कोणी तयार नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची पूर्वनियोजित ठरवून अत्यंत कुर पद्धतीने, हाल हाल करून हत्या करण्यात आली. सुमारे तीन तास त्यांच्या शरीरावर अन्वणीत अत्याचार करण्यात आले. अनेक वार व जखमा करण्यात आल्या. सरपंच संतोष देशमुख यांचा गुन्हा काय होता ? त्यांनी कंपनीतून खंडणी वसूल करण्यासाठी वाल्मीकी कराड आणि गॅंगला विरोध केला होता. या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. भाजपचे आमदार सुरेश धस तसेच आमदार जयदत्त क्षीरसागर आमदार जितेंद्र आव्हाड या सर्वांनी जनप्रक्षोप आणि आक्रोश सरकार पुढे मांडला आणि सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केला आणि शेवटी या हत्येमागचा मागचा मुख्य सूत्रधार ठरलेला वाल्मीक कराड आणि त्याची गॅंग जेलआड गेली. मात्र प्रकरण इथेच थांबलेले नाही. महादेव मुंडे या व्यापाऱ्याची हत्या त्याच क्रूर आणि अमानुष पद्धतीने करण्यात आली. बारा गुंठे जमीन नावावर करून देत नाही म्हणून वाल्मीक कराड आणि त्याचा उजवा हात असलेला गोट्या गीते या दोघांनी आपल्या साथीदारांना पाठवून महादेव मुंडे याला तहसीलदार कार्यालयासमोर अडवून सुरुवातीला त्याच्या पायावर वार करून त्याला खाली पडले आणि त्याच्यानंतर पाठोपाठ जवळपास पंधरा वार करण्यात आले महादेव मुंडे जखमांनी ओरडत होता तो ओरडत होता म्हणून त्याच्या तोंडावर वार करण्यात आला आणि वार तो चुकून गालावर लागला जवळपास त्याचा गालाचा तुकडाही पडला तरीही तो ओढत होता म्हणून त्याच्या गळ्यावर वार करण्यात आला आणि त्यानंतर अनेक वार करून ठार मारण्यात आले. गोट्या गीतेने त्यावेळी महादेव मुंडेच्या मानेचा तुकडा कापून काढला आणि तो तुकडा वाल्मिकी कराच्या टेबलवर ठेवला पुढे हा दोन-तीन दिवस तुकडा गावांमधून फिरवण्यात आला. या तुकडा काढण्याच्या घटनेची पुष्टी पोस्टमार्टम रिपोर्टमधूनही होत आहे. ही कोणत्याही चित्रपटातील कथा नाही तर ही सत्य घटना आहे. हा सर्व घटनाक्रम एकेकाळीचा वाल्मिकी कराडचा साथीदार असलेल्या बाळा बांगर यांनी वारंवार खुलासा करून सांगितली आहे. त्यांनी आपल्या पोलिसांना दिलेल्या गुप्त जबाबात ही माहिती दिलेली आहे व आताही तो हेच सांगत आहे. बाळा बांगरने तर अलीकडे सांगितले की, त्याच्या समक्ष तिघाजणांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांची हत्या होताना त्या अगोदर वाल्मिकी कराडने त्याला सांगितले होते की, आज संध्याकाळी एक सरपंचाला संपवण्यात येणार आहे. महादेव मुंडे यांच्या हत्येच्या घटनेला जवळपास २१ महिने उठून गेले आहेत आणि सर्व संशयित आरोपी परळीत मोकाट फिरत असून सुद्धा हात लावायची हिम्मत पोलिसांना होत नाही. महादेव मुंडे हत्याप्रकरणी तपास करणाऱ्या आठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. या प्रकरणातील सुरुवातीचा जो तपास आत्ताचे अमरावतीतील सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमावत आणि पोलीस निरीक्षक साबळे यांनी केला होता. त्यामध्ये आरोपींना अटक करण्यासाठी दारापर्यंत पोहोचलेले हे दोघेही अधिकारी परत आले कारण ‘बंगल्यावरून ‘ फोन आला. नंतर या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि त्यापुढे सर्वच अधिकाऱ्यांना एकापाठोपाठ एक बदल्या होत गेल्या. त्याचे कारण बंगल्यावरून गेलेले फोन, हललेली सुत्रे. या बंगल्यावरून वाल्मिकी कराडच पूर्ण बीड जिल्ह्याचा कारभार हाताळत होता. एकेकाळी साफसफाईची कामे करणारा हा वाल्मिकी कराड आज हजार कोटीची मालमत्ता कमवून आहे. पण अजूनही ईडी आणि सीबीआयला याची भनक नाही हेच मोठे आश्चर्य आहे. वाल्मीकी कराडला दररोज एक लाख रुपये टेबलवर लागायचे त्याच्या दोन हजार तरी कमी पडले तरी तो प्रचंड अत्याचार करायचा. खंडणी गोळा करणे,जमिनी लाटणे, राखेतून प्रचंड पैसा कमावणे वाळू तस्करी करणे, कंपन्यांकडून हप्ता वसुली करणे हे रोजचे काम या गॅंगच्या होते. संपूर्ण प्रशासकीय व पोलीस यंत्रणा यांच्या दावणीला होती. संतोष देशमुख हत्याप्रकारांत जेव्हा वाल्मिकी कराडला पोलिसांनी बीड येथे नेले त्यावेळी पोलिसांच्या गाडीमध्ये पहिल्या सीटवर गोट्या गीते बसला होता. यापेक्षा पोलिसांच्या नैतिकतेची , कामाची आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची, शरणागतीची आणि लाचारीची अधोगती काय असू शकेल ? महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर दोन पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केला परंतु त्यांना हटवण्यात आले त्यानंतर हा तपास पूर्णपणे थांबला पण या दरम्यान महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे येणे या विषयाचा पाठलाग सुरूच ठेवला. ज्ञानेश्वरी मुंडे यांचा भाऊ सतीश याने स्वतः दीड लाख खर्च करून ‘डम्प डाटा ‘ मिळवला. दम डाटा म्हणजे एखाद्या व्यक्तीचा कॉलिंग , मेसेजस , ई -मेल, सोशल मीडिया, लोकेशन हिस्ट्री याशिवाय गुगल क्रोम या सर्वांवरची माहिती गोळा करणे. ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या भावाने सायबर एक्स्पर्टना हाताशी धरून हा सर्व डाटा गोळा केला जे काम खरं तर पोलिसांनी करायला हवे होते. या डाटातून दोनशे संशयास्पद कॉलिंग नंबर नंबर व्हिजिलन्सला टाकण्यात आले आणि त्यातून काही नंबर बाजूला काढून चौकशी करण्यात आली आहे ज्याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये अधिवेशन काळात दिली होती. मात्र जसा पाहिजे तसा तपासाचा वेग वाढला नाही. बाळा बांगरसह आणखी काही साक्षीदार आहेत त्यांना पोलिसांनी बोलावले पाहिजे आणि महादेव मुंडे यांच्या हत्येतील खरे आरोपी पकडले पाहिजेत. या गॅंगच्या मोडस ऑपरेंडी प्रमाणे काहीजण पुढे येऊन आम्हीच खून केला किंवा हत्या केली असे सांगतात आणि खरे आरोपी हे मोकाटच असतात त्यामुळे हे घडू नये यासाठी इथे काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनकडे विशेष तपास पथकाची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी ज्ञानेश्वरी मुंडे व त्यांच्या मुलांना भेटीसाठी बोलावले त्यांच्याशी चर्चा केली व त्यांच्या मागणीप्रमाणे आता विशेष पोलीस पथक स्थापन करण्यात आले. या पथकामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांना जे अधिकारी हवे तेच अधिकारी समाविष्ट करून घेण्यात आले आहेत. कदाचित या एटीएसद्वारे गोट्या गीतेसह मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळण्यात येतील. पण बीड जिल्ह्यातील ही विकृत, क्रूर आणि माणुसकी काळीमा फासणारी प्रवृत्ती आणि वृत्ती समूळ नष्ट झाली पाहिजे. गोट्या गीते आणि वाल्मिकी कराड हे दोघे नरराक्षस आहेत. अशा नरराक्षसांना कायद्याने फाशीची शिक्षा व्हावी अशीच मागणी तमाम सामान्य बिडवासिय नागरिक करत आहेत. ज्या दिवशी या नरराक्षसांचा खातमा होईल त्याच दिवशी बीडची माती आणि बीडची माणसं मोकळा श्वास घेतील. येथील नेते धनंजय मुंडे म्हणाले होते माझ्या बीडच्या ‘मातीची ‘ बदनामी कशासाठी ? बीडच्या मातीची बदनामी लोकांनी केली नाही तर ‘पनाह ‘ दिलेल्या नरराक्षक्षसांनी बीडच्या मातीला मातीमोल केले आहे. या गोट्या गीतेची एवढी हिंमत आहे की, तो अजूनही पिस्तुले घेतलेली व्हिडिओ करतो आहे , नैवेद्य दाखवतो आहे आणि पोलिसांना चॅलेंज करतो आहे. आता स्थापन करण्यात आलेल्या एटीएसने या गॅंगला कायद्याचा ‘प्रसाद ‘ दाखवून बीडची ही काळी फाईल बंद करावी.

संपादक – सतीश कदम

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.