RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

संगमेश्वर-कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक व संग्रहालय उभारावे

आ. शेखर निकम यांची शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, ना. एकनाथ शिंदे, ना. शंभूराजे देसाई, ना. उदय सामंत ना .योगेश कदम सकारात्मक

मुंबई:– महापराक्रमी स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे संगमेश्वर-कसबा या ऐतिहासिक ठिकाणी लवकरात लवकर जागतिक दर्जाचे स्मारक व संग्रहालय उभे करावे, अशी मागणी आ. शेखर निकम यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री ना. शंभूराजे देसाई, राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीला या सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावरून संगमेश्वर- कसबा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक तसेच संग्रहालय उभारणीचा मार्ग मोकळा होणार आहे. याबाबत चिपळूण- संगमेश्वरवासीयांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

या निवेदनानुसार जाज्वल्य धर्माभिमान, तेजस्वी बुद्धिमत्ता आणि तळपता पराक्रम हे ज्या राज्याच्या ठायी होते, ते राजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र, ज्यांनी आपल्या ३२ वर्षांच्या छोट्या आयुष्यात राष्ट्रासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांची गाथा आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात जिवंत आहे. त्यांच्या चरित्राचा अभ्यास करणे हे तरुणाईसाठी प्रेरणादायक आहे. महाराजांची पराक्रमी गाथा आपल्याला फक्त त्यांच्या शौर्यामुळेच नाही. तर त्यांच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेमुळेही समजते. एवढ्या कमी वयात त्यांनी तीन महाकाव्य लिहून आपली प्रतिभा दर्शवली.

संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपुर हे ऐतिहासिक ठिकाण, रायगडावरून पन्हाळा आणि गोव्याकडे जाणाऱ्या मार्गावरस्थित आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी इथे एक वाडा बांधला होता. छ. संभाजी महाराजांवर मोगल सैनिक चालून आले. त्यावेळी त्यांच्यात झालेली शेवटची लढाई, ज्यामध्ये ३०० ते ४०० मावळ्यांसोबत छत्रपती संभाजी महाराजांनी शौर्याचा ठसा उमठवला, ती हीच भूमी. या ऐतिहासिक भूमीवर छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक स्मारक व्हावेही प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे.

यानुसार या ऐतिहासिक स्थळावर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारावे आणि त्यासोबत एक संग्रहालय देखील उभारावे. छ. संभाजी महाराज हे केवळ एक योद्धा नव्हते, तर एक प्रगल्भ, पुरोगामी आणि प्रगतीशील विचार करणारे राजा होते.

मुंबई घेण्यासाठीचा पहिला करार त्यांनी केला होता. त्यांच्या काळात धरणे बांधण्याचे प्रयोग झाले. कायद्यानुसार गुलाम गिरीवर बंदी घालणारा पहिला राजा. देहू आळंदीच्या पालख्याना पहील राजकीय संरक्षण दिले. जहाज बांधणी उद्योगाचा पहिला प्रयोग, स्त्रियांना राजकीय, सामाजिक सन्मान मिळवून देणारे पहिला राजा . महाराणी येसुबाईना सखी राज्ञी जयती असा सन्मान दिला. त्याचबरोबर त्या कुलमुक्त्यार असून त्यांची नाममुद्रा सुद्धा होती. अशा महान, पराक्रमी राजाच्या सर्व गोष्टींची इथे संग्रहालयात जपणूक व्हावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तर या निवेदनात पुढे म्हटले आहे की, आपला इतिहास हा आपला अभिमान आहे. संपूर्ण जगभरातील मराठी माणूस आपल्या या राजाचे स्मारक होण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.

या निवेदनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून संगमेश्वरमध्ये शंभूराजांचे स्मारक व संग्रहालय होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. याबाबत चिपळूण -संगमेश्वरमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.