चिपळूण : (प्रतिनिधी)अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नुकत्याच घडलेल्या एका अत्यवस्थ हृदयविकाराच्या रुग्णाच्या उपचारासंदर्भात निर्माण झालेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटल प्रशासनाने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये अपरान हॉस्पिटल ने आपली बाजू मांडली आहे ज्यामध्ये काही गोष्टी आता समोर आल्या आहेत
आपल्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात आपण हॉस्पिटल प्रशासनाने नमूद केले आहे की, सुमारे ७० वर्षीय वृद्ध रुग्णाला तीव्र हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) आल्याने अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशा परिस्थितीत प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्याने डॉक्टरांनी नातेवाईकांच्या संमतीने तातडीने जीवनरक्षक उपचार सुरू केले.
रुग्णाला Abbott कंपनीचे Inj. Tenectelex 40 हे रक्तातील गुठळ्या विरघळवणारे अत्यावश्यक इंजेक्शन देण्यात आले. रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामुळे दोन इंजेक्शन्स द्यावी लागली. या दोन इंजेक्शन्सची एकूण किंमत सुमारे ₹1,07,859.84 इतकी होती. रुग्णाने पुढील ३६ तास अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेतले. तपासण्या, औषधे आणि उपचारांसह एकूण बिल सुमारे ₹1.47 लाख झाले. त्यापैकी रुग्णालयाचे प्रत्यक्ष सेवा शुल्क केवळ ₹20 ते ₹22 हजार इतके असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. सध्याच्या घडीला तरी यातील काहीही शुल्क हॉस्पिटल कडे जमा नाही अशी माहिती आहे.
गंभीर रुग्ण आल्यावर प्रथम त्याचा जीव वाचवणे हेच डॉक्टरांचे नैतिक कर्तव्य असते. अनेकदा रुग्णासोबत निर्णय घेणारी जबाबदार व्यक्ती तत्काळ उपस्थित नसते. अशा वेळी आर्थिक चर्चेत वेळ न दवडता उपचार सुरू करणे आवश्यक ठरते.
हॉस्पिटलने उपचार सुरू करण्यापूर्वी कोणतेही डिपॉझिट मागितले नाही किंवा उपचारांसाठी पैसे भरण्याची अट घातली नाही. उपचारानंतरही बिलाची रक्कम जमा न करता रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यावर पुढील अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टीसाठी डेरवण येथील रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णाची सुधारलेली स्थिती ईसीजी अहवालातूनही स्पष्ट होत असल्याचे व्यवस्थापनाने नमूद केले.
प्रशासनाने सांगितले की, उपचारांच्या बिलामध्ये महागड्या जीवनरक्षक औषधांचा मोठा वाटा होता. या घटनेमुळे डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे मनोबल खचले आहे.
गंभीर रुग्ण आल्यावर प्रथम उपचार करावेत की आधी खर्चाचा अंदाज देऊन निर्णयाची वाट पाहावी? आधी पैसे जमा करून घ्यावेत की रुग्णाचा जीव वाचवण्याला प्राधान्य द्यावे? अशा घटनांमुळे केवळ अपरांत हॉस्पिटलच नव्हे, तर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रासमोर गंभीर प्रश्न उभे राहत आहेत