मराठा क्रांती प्रतिष्ठानचे तहसिलदार व डीवायएसपींना निवेदन व तक्रार
चिपळूण – कथित अभिनेता राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात जे अपशब्द वापरले आहेत आणि महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत याप्रकरणी आपण गुन्हा दाखल करावा अशी मागणी येथील मराठा क्रांती प्रतिष्ठान व मराठा समाजाच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली. येत्या पंधरा दिवसात हा जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही प्रचंड मोर्चा काढू असा इशारा ही मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.
मराठा क्रांती प्रतिष्ठान च्या वतीने तहसीलदार श्री.लोकरे व डीवायएसपी श्री.औटी तसेच पोलीस निरीक्षक मेंगडे यांना निवेदन आणि तक्रार देण्यात आली या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की,कथित अभिनेता राहुल सोलापूरकर याने एक महिनापूर्वी एका पॉडकास्टला मुलाखत देताना, महाराष्ट्राचे आराध्यदैवत, जगातील महान राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अत्यंत चुकीचे व निखालास खोटे वक्तव्य केले आहे. सोलापूरकर याने या मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्र्याहून सुटका करताना मुघल सैनिकांना लाच दिल्याचे अत्यंत हीन दर्जाचे शब्दप्रयोग केले आहेत. हे केवळ निषेधार्ह नाही तर चीड आणणारेच आहेत. राहुल सोलापूरकर याच्या या विधानाने संपूर्ण महाराष्ट्रात तमाम शिवप्रेमींच्या मनामध्ये संताप उमटला आहे. सोलापूरकर याने पुढे म्हटले आहे की आपण रंजक आणि गंमतीने म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास गंमतीचा आणि रंजक नाही तर तो प्रेरणादायी आहे व अनेक वर्ष तो असाच अनेक पिढ्याला मार्गदर्शन करत राहणारा आहे हे या राहुल सोलापूरकरला सारख्या मूर्खाला कसे कळणार ? पण ही जाणून-बुजून तयार केलेली दिशाभूल आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका ही घटना संपूर्ण जगात अत्यंत महत्त्वाची घटना म्हणून नोंद आहे व याबाबत सर्व कागदपत्र उपलब्ध असल्याचेही इतिहास अभ्यासक व संशोधक इंग्रजीत सावंत यांच्यासारखे अनेक इतिहास अभ्यासकांनीही स्पष्ट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निसटल्यानंतर औरंगजेबानेही महाराजांना व छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी जंग जंग पछाडले होते हेही इतिहासात नोंद आहे. मात्र सोलापूरकर याने खोटा इतिहास सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तसेच महाराजांच्या पराक्रमावर ही त्यांनी बोट दाखवण्याचा प्रयत्न केला
पण त्याचा हा प्रयत्न म्हणजे सूर्यावर थुंकण्याचाच विषय आहे. परंतु काळ सोकावता कामा नये या म्हणीनुसार राहुल सोलापूरकर याचेवर तमाम महाराष्ट्राच्या जनतेची भावना दुखावल्या प्रकरणी ताबडतोब गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा प्रेरणादायी, पराक्रमाचा आणि शौर्याचा आहे तो साडेतीनशे वर्षानंतरही या प्रेरणादायी इतिहासाची तमाम शिवप्रेमी जपणूक करत आले आहेत. त्यांच्या भावनांना ठेच पोहचवण्याचे कृत्य या सोलापूरकर याने केले आहे ते अत्यंत निषेधार्थ आणि नीच कृत्य आहे. याबाबत आपण त्वरित आमच्या भावना समजून गुन्हा दाखल करण्याचीकारवाई करावी अशी आमची मागणी आहे. यावेळी मराठा क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळा कदम,उपाध्यक्ष सतीश कदम, सचिव राजेश कदम,बाळा कदम, चित्रा चव्हाण, अजित साळवी, प्रदीप साळुंखे, अंजली कदम, संतोष सावंतदेसाई, विक्रांत सावंत, सुनील चव्हाण, शिवानी भोसले, निर्मला जाधव, सचिन नलावडे, रमेश शिंदे, स्नेहल चव्हाण, शैलेश शिंदे, दिप्ती सावंतदेसाई, सतीश शिंदे, टी. डी. पवार, सुनील सावंतदेसाई आदींचे शिष्टमंडळ उपस्थित होते.