आमदार शेखर निकम यांची ना. पंकजा मुंडे यांच्याकडे मागणी
चिपळूण : शहरातील तलावांच्या संवर्धनासाठी आमदार शेखर निकम यांनी पुढाकार घेतला असून राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत रामतीर्थ व वीरेश्वर तलावाच्या संवर्धनासाठी निधी मिळावा, अशी मागणी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री ना. पंकजा मुंडे यांच्याकडे नुकतीच निवेदनाद्वारे केली आहे. तर चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांचीदेखील महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात चिपळूण शहराच्या विकासासाठी आमदार शेखर निकम यांनी पुढाकार घेतल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये शहरात वाशिष्ठी नदीवरील पेठमाप व शंकरवाडीला जोडणारा पूल असो, पवन तलाव व गोवळकोट मैदानाच्या सुशोभिकरणासाठी घेतलेला पुढाकार तसेच नारायण तलाव असो आदी शहरातील कामांसाठी आ. निकम यांनी नेहमीच पुढाकार घेतला. यामुळे खेळाडू व पर्यटकांना चांगला वाव मिळाला आहे.
चिपळूण शहराच्या वैभवात आणखी भर पडावी, यासाठी आमदार शेखर निकम यांनी आता पुढाकार घेतला असून राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत शहरातील वीरेश्वर तलावाच्या संवर्धनासाठी १ कोटी ५१ लाख ६५ हजार ६६४ रुपये व रामतीर्थ तलावाच्या संवर्धनासाठी ३ कोटी ७९ लाख ८३ हजार ७९९ रुपयांच्या निधीस मंजुरी मिळून प्रशासकीय मान्यता मिळावी अशी मागणी केली आहे. या निवेदनावर ना. पंकजा मुंडे यांनी सकारात्मकता दर्शवली असून लवकरच या दोन्हीच्या कामांसाठी निधी मिळून चिपळूण शहराच्या वैभवात भर पडण्यास मदत होणार आहे.